Breaking-news

शिवसेना (ठाकरे)–मनसे युतीवर शिक्कामोर्तब; राज ठाकरेंकडून ऐतिहासिक युतीची घोषणा!

मुंबई | राज्यातील महापालिकांची निवडणूक जाहीर झालेली आहे. या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर अखेर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, की आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत. मी मागेच सांगितलं होतं की आम्ही एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठी. मी सर्वांना सांगतो की यापुढे मुंबईवरती आणि महाराष्ट्रावर कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं किंवा कपटी मनाने पाहिलं तर त्यांचा खात्मा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.

मराठी माणसाने बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली. त्याची आठवण आज होणं साहजिक आहे. आमच्या दोघांचेही आजोबा प्रबोधनकार हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातल्या पहिल्या पाच सेनापतींमधले एक होते. माझे वडील बाळासाहेब ठाकरे, राजचे वडील श्रीकांत ठाकरे म्हणजे आख्खं ठाकरे घराणं मुंबईसाठी तेव्हा संघर्ष करत होता. त्यानंतरचा इतिहास मी तुम्हाला सांगत बसत नाही. पण महाराष्ट्राने मुंबई मिळवल्यावर मुंबईतच मराठी माणसाच्या उरावर उपरे नाचायला लागले आणि न्याय्य हक्क्सांसाठी बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनेला जन्म घालावा लागला. मधली वर्षं व्यवस्थित गेली. पण आज पुन्हा एकदा मुंबईचे लचके तोडायचे मनसुबे दिल्लीतल्या दोघांचे आहेत. आत्ता जर आपण भांडत राहिलो, तर मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाचा अपमान असेल. आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा     :            पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी २ हजार २१२ नामनिर्देशन अर्जांची विक्री 

यापुढे मुंबईवर आणि महाराष्ट्रावर कुणीही वाकड्या नजरेनं किंवा कपटी कारस्थानांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करेल, त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत.मी सगळ्या मराठी जनांना सांगतो, आता जर चुकाल, तर संपाल. आता फुटाल, तर पूर्णपणे संपून जाल. त्यामुळे तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका. मराठी माणूस सहसा कुणाच्या वाटेला जात नाही. पण त्याच्या वाटेला जर कुणी आलाच, तर त्याला परत जाऊ देत नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

राज ठाकरे म्हणाले, की मला बाकी जे बोलायचंय ते जाहीर सभांमधून बोलेन. मात्र, मी एका मुलाखतीत बोलताना म्हटलं होतं की, कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि तिथून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली. कोण किती जागा लढवणार? आकडा काय? हे आम्ही तुम्हाला सांगणार नाही. महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्या फिरतायत, त्यात दोन व्यक्ती समाविष्ट झाल्या आहेत. ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात. जे निवडणुका लढवणार आहेत, त्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल. अर्ज कधी भरायचे वगैरे माहिती नंतर दिली जाईल. बरेच दिवस ज्याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता, ती शिवसेना (ठाकरे) व मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करत आहोत, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button