#Lockdown:पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी 31 मेपर्यंत बंद
पंढरपूर. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ३१ मे २०२० पर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आल्याची माहिती विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
जोशी यांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हा विषाणू तीव्र संसर्गजन्य स्वरूपाचा असल्याने राज्यामध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तातडीने खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याने भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर १७ मार्च ते १७ मे २०२० या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते.
दरम्यान, केंद्र व राज्य शासनाने ३१ मे पर्यंत संपूर्ण देशभरात लाॅकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच आपल्या सोलापूर जिल्ह्यात देखील कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. ही बाब विचारात घेता मंदिर समितीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ३१ मे २०२० पर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पहाटे होणारी श्रींची काकडा आरती, नित्यपूजा, महानैवेद्य, पोशाख, धुपारती व शेजारती इथपर्यंतचे सर्व उपचार तसेच सध्या सुरू असलेली चंदनउटी पूजा परंपरेनुसार जो पूजोपचार बजावण्यात येत आहे. तिच्या पध्दतीत खंड न पाडता किंवा व्यत्यय न आणता मंदिरात नित्य म्हणजेच दैनंदिन पूजा सुरू राहील.