#Lockdown:दारुवर ७० टक्के कोरोना टॅक्सचा वाद कोर्टात
![Liquor stores opened in Chandrapur district](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/Daru-BAR.jpg)
नवी दिल्ली : देशात लॉकडाऊन ४ ला सुरुवात झाली असून ३१ मे पर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे. देशाला ग्रीन, ऑरेंज, रेड झोनमध्ये विभागण्यात आले आहे. लॉकडाऊन ३ मध्ये काही काळासाठी दारु विक्री सुरु ठेवण्याचा निर्णय शासनाला महागात पडला होता. सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवल्याने ही दारुविक्री तात्काळ थांबवावी लागली. दरम्यान दिल्लीमध्ये दारुच्या विक्रीवर ७० टक्के विशेष कोरोना शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण याचिकाकर्त्यांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतली.
दिल्ली सरकारच्या या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून याप्रकरणी सरकारला नोटीस जाहीर करण्यात आली आहे. न्यायमुर्ती डीएन पटेल आणि न्यायमुर्ती हरि शंकर यांच्या खंडपीठाने याप्रकरणाची सुनावणी २९ मेला ठेवली आहे.
दिल्ली उत्पादन शुल्क कायद्याच्या कलम २६ नुसार सरकार केवळ शुल्क, परवाना शुल्क, लेबल नोंदणी शुल्क आणि आयात / निर्यात शुल्क या चार वस्तूंद्वारे महसूल वसूल करू शकते. सरकार विशेष कोरोना फीसच्या नावाखाली हा कर घेऊ शकत नाही अशी बाजू याचिकाकर्त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात मांडली. एडवॉकेट भारत गुप्ता आणि वरुण त्यागी यांनी ही याचिका दाखल केली.
सरकारने हा विशेष कर उकळण्यासाठी उत्पादन अधिनियम कलम ८१चा आधार घेतला आहे. कलम ८१ (२) (जी) या कलमात केवळ प्रक्रियात्मक आणि नियामक आणि इतर तरतुदी आहेत. दिल्ली सरकार कलम ८१ नुसार विशेष कोरोना फी वसूल करू शकत नसल्याचेही याचिकाकर्त्यांनी म्हटले. सरकारचे हे पाऊल म्हणजे विसंगत आणि मनमानी असून कलम २६५ चे उल्लंघन असल्याचे ते म्हणाले.
हा कर कलम १४ अंतर्गत समानता आणि समान संरक्षणाच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करतो. फक्त किरकोळ विक्रीमध्ये एमआरपीवर हा कर आकारला जातोय. याचा अर्थ दारुचा कर थेट ग्राहकांकडूनच वसूल केला जात असल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. संबंधित कायद्याच्या तरतूदीमध्ये ग्राहकांवर अशी ड्यूटी लावण्याविषयीचा उल्लेख नाही. त्यामुळे हा कर बेकायदेशीर असून तो रद्द करावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली.