Facebook Down: जगभरात फेसबुक ठप्प! लॉग-इन करताना येतोय ‘हा’ मेसेज

Facebook Down | सोशल मीडिया क्षेत्रातील आघाडीचा प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकचे (Facebook) सर्व्हर अचानक डाऊन झाल्यामुळे आज (१९ जुलै) सकाळी जगभरातील कोट्यवधी युजर्सना मोठ्या तांत्रिक समस्येचा फटका बसला. डेस्कटॉप आणि मोबाईल अशा दोन्ही माध्यमांवर फेसबुक वापरताना युजर्सना अडचणी येत असून, अनेकांचे अकाऊंट लॉग-इन होत नसल्याचे समोर आले आहे.
वेबसाइट्सच्या तांत्रिक अडचणींवर लक्ष ठेवणाऱ्या ‘डाऊनडिटेक्टर’ (Downdetector) या पोर्टलनुसार, आज सकाळी साधारण साडेआठ वाजल्यापासून फेसबुकबाबत तक्रारी करणाऱ्या युजर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली. हजारो युजर्सनी फेसबुक काम करत नसल्याच्या तक्रारी इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर (उदा. एक्स – पूर्वीचे ट्विटर) नोंदवल्या आहेत.
युजर्सना काय येत आहेत अडचणी?
जे युजर्स लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर वेब ब्राउझरवरून फेसबुक लॉग-इन करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना “Account Temporarily Unavailable” (अकाऊंट तात्पुरते अनुपलब्ध आहे) असा मेसेज स्क्रीनवर दिसत आहे. यासोबतच ज्यांचे अकाऊंट आधीच लॉग-इन आहे, त्यांना त्यांची टाइमलाइन आणि फीड लोड न होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. फेसबुकचे मोबाईल ॲप्लिकेशन उघडत असले, तरी ते अत्यंत संथ गतीने चालत असून नवीन पोस्ट किंवा व्हिडिओ स्क्रोल होत नसल्याची तक्रार युजर्सनी केली आहे.

हेही वाचा
पी. व्ही. सिंधूचा ऐतिहासिक पराक्रम! जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला
सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस:
फेसबुक अचानक डाऊन झाल्यामुळे नेटकऱ्यांनी आपला मोर्चा ‘एक्स’ (ट्विटर) कडे वळवला आहे. सध्या सोशल मीडियावर #FacebookDown हा हॅशटॅग प्रचंड ट्रेंडींगमध्ये असून, युजर्स याद्वारे वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया आणि मीम्स शेअर करून आपला संताप व्यक्त करत आहेत.
मेटा (Meta) कंपनीकडून या आऊटेजचे मुख्य कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, सर्व्हरमधील अंतर्गत बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच फेसबुकची सेवा पूर्ववत होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.




