70 वर्षांनंतर सेओलमधून अमेरिकन सैन्य मागे
सेओल (दक्षिण कोरिया) – 70 वर्षांनंतर दक्षिण कोरियाची राजधानी सेओलमधून अमेरिकेचे सैन्य मागे घेण्यात आले आहे. सेओलमधील अमेरिकन लष्करी तळ बंद करण्यात आल्याचे आज अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर जपानला धडा शिकवण्यासाठी अमेरिकीने सेओलमध्ये लष्करी तळ उभारला होता.तो बंद करून उत्तर कोरियाच्या सीमेपासून दूर दक्षिण सेओलमध्ये कॅंप हंफ्रीज येथे नवीन लष्करी तळ उभारण्यात आलेला आहे.
दक्षिण कोरियात 28,500 अमेरिकन सैनिक तैनात करण्यात आलेले आहेत. दक्षिण कोरिया आणि अमेरिका मिळून उत्तर कोरियावर दबाव घालण्याचे काम करत आहेत.
गुरुवारी अमेरिकेचे संरक्षण मंत्री जिम मॅटिस यांनी दक्षिण कोरियाचे मंत्री सोंग यंग मू यांची भेट घेतली. दक्षिण कोरियाबाबत अमेरिकेच्या बांधिलकीत काही कमी होणारा नाही, असे मॅटिस यांनी स्पष्ट केले आहे. उत्तर कोरियाबरोबर अमेरिकेच्या संबंधात सुधारणा होत असली, तरी अमेरिका दक्षिण कोरियाची साथ देत राहणार असल्याचे हे आश्वासन मानले जात आहे.
दक्षिण कोरियातील प्यांग्टिक बंदर भागात असलेला कॅंप हंफ्रीज हा नवीन अमेरिकन लष्करी तळ 3510 एकर क्षेत्रात पसरलेला असून तो अमेरिकेचा अमेरिकेबाहेरचा सर्वात मोठा लष्करी तळ् आहे. त्यासाठी 11 अब्ज डॉलर्स खर्च करण्यात आलेला आहे.