26 बेटांवरील स्थितीचा मोदींनी घेतला आढावा
नवी दिल्ली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सागरी हद्दीत असलेल्या 26 बेटांवरील स्थितीचा आज एका बैठकीत आढावा घेतला. या बैठकीत नीति आयोगाने या बेटांच्या विकासाच्या आराखड्याबाबत सादरीकरण केले. त्यात या बेटांवरील पायाभूत सुविधांचे प्रकल्प, डिजीटल कनेक्टेव्हीटी, ग्रीन एनर्जी, कचरा प्रक्रिया प्रकल्प, मत्स्य व्यवसायाला दिले जाणारे प्रोत्साहन आणि पर्यटन व्यवसाला दिली जाणारी चालना या अनुषंगाने त्यांना सादरीकरण करण्यात आले. अंदमान निकोबार बेटांवर पर्यावरण संतुलीत पर्यटनाला चालना देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ही बेटे उर्जेच्या बाबतीत स्वयंपुर्ण व्हावीत यासाठी प्रयत्न व्हायला हवेत अशी अपेक्षा पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली.
विदेशी नागरीकांना अंदमान आणि निकोबार बेटांवरील काहीं भागात जाण्यासाठी सुरक्षा दृष्टीने निर्बंध घालण्यात यावेत अशी शिफारस गृहमंत्रलयाने केली असल्याची माहितीही यावेळी पंतप्रधानांना देण्यात आली. लक्षद्वीप बेटांवरील ट्युना माशांचा व्यवसाय सध्या मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. त्यातून लक्षद्वीपला चांगला आर्थिक लाभ होत आहे. त्या मत्स्यव्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहितीही त्यांना सादर करण्यात आली.