३१ डिसेंबरसाठी पोलिसांचा ‘संस्कारी’ संदेश, जाणून घ्या काय म्हटलंय परिपत्रकात
गुजरातमधील वडोदरा पोलिसांनी नववर्षाच्या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी काढलेले एक पत्रक चर्चेचा विषय ठरत आहे. ‘मद्यपान करुन वाहन चालवू नका, सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करु नका’, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, या पत्रकात ‘अशा स्वरुपाचे सेलिब्रेशन सुसंस्कृत समाजासाठी हानिकारक आहे’, असे देखील म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांचा संस्कारी संदेश सध्या वडोदऱ्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
वडोदऱ्याचे पोलीस आयुक्त अनुपम सिंह गहलोत यांनी नागरिकांसाठी एक परिपत्रक जारी केले आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. ‘३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षाचे स्वागत करण्यासाठी समाजकंटक स्वत: किंवा ठराविक लोकांच्या माध्यमातून पार्टीचे आयोजन करतात. या पार्टीदरम्यान मद्य दिले जाते आणि यामुळे असभ्य वर्तन किंवा इशारे केल्याच्या घटना घडतात. अशा स्वरुपाचे सेलिब्रेशन हे लहान मुलांसाठी आणि सुसंस्कृत समाजासाठी हानिकारक आहे, असे या परिपत्रकात म्हटले आहे.
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करुन असभ्य वर्तन करणे, वेगाने वाहन चालवणे किंवा स्टंट करणे यावर निर्बंध असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. याशिवाय रात्री १० नंतर लाऊडस्पीकर, फटाके फोडल्याने त्रास झाल्याची तक्रार आल्यास संबंधितांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी पार्टीचे आयोजन करणाऱ्यांनी पोलिसांची परवानगी घ्यावी, असेही यात म्हटले आहे.
पोलिसांनी नववर्षांच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर परिपत्रक काढणे योग्य आहे, पोलिसांनी नागरिकांना कायद्याची आठवणही करुन द्यावी, मात्र परिपत्रकात सुसंस्कृत समाज अशा शब्दाचा प्रयोग करणे कितपत योग्य ?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.