२३.५० किलोमीटर दुहेरीकरणाचे काम चक्क सहा दिवसातच केले पूर्ण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/25railway_.jpg)
सोलापूर | महाईन्यूज
मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागात असलेल्या बोरोटी-दुधनी-कुलाली या २३़५ किलोमीटरपर्यंतच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले, या पूर्ण झालेल्या कामाची पाहणी मंगळवारी सोलापूर विभागातील वरिष्ठ अधिका-यांच्या पथकाने केली आहे. उर्वरित वाडी ते सोलापूरपर्यंत शिल्लक २७ किलोमीटरचे काम मेअखेरपर्यंत पूर्णत्वास येईल, असे रेल्वेच्या अधिका-यांनी सांगितले आहे.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे़ सध्या सोलापूर विभागाने सोलापूर ते वाडीपर्यंतच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण करण्याचा निश्चिय केला आहे. त्यानुसार बुधवार १९ फेबु्रवारी रोजी वाडी सेक्शनमधील बोरोटी-दुधनी-कुलालीदरम्यानचे काम हाती घेतले आहे. हे २३़५० किमीचे काम सोमवारी संपविण्यात आले त्यानुसार मंगळवार २५ फेबु्रवारी रोजी मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक शैलेंद्र गुप्ता, रेल विकास निगम लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी आनंद स्वरूप, ए़ के. जैन, गौतमकुमार, एस़ के. निरंजन, आरपीएफ, लोहमार्गचे अधिकारी व कर्मचा-यांच्या उपस्थितीत पाहणी दौरा झाला़ उर्वरित सोलापूर ते वाडीपर्यंत २७ किमीचे काम मेअखेर पूर्ण करून विद्युतीकरणाच्या कामाला गती देण्यात येणार असल्याचेही रेल्वेच्या अधिका-यांनी सांगितले.