१४ महिन्याच्या पाकिस्तानी चिमुकल्याला मिळाले भारतात जीवदान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/heart.jpg)
पाकिस्तानमधील एक चिमुकला अजून आपल्या पायावर उभेही राहायला शिकला नव्हता मात्र त्याआधीच त्याला असलेल्या आरोग्याच्या समस्येने त्याचे नातेवाईक हैराण झाले होते. हृदयाची समस्या असल्याने जगदीश राम या १४ महिन्यांच्या बाळाला दिल्लीतील गंगाराम हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी जावे असे सांगण्यात आले. त्याचे हृदय डाव्या बाजूला नेहमीपेक्षा वाढलेले होते. त्यामुळे त्याला नीट श्वास घेणेही शक्य होत नव्हते. तर याचठिकाणी एक छिद्र होते, डाव्या आणि उजव्या भागाच्या मध्यभागीही अंतर पडले होते. या तिन्ही समस्या असल्याने त्याला श्वास घेण्यात अडचणी येत होत्या.
आता दिल्लीतील गंगाराम हॉस्पीटलमधील डॉक्टरांसमोर त्याला बरे करण्याचे मोठे आव्हान होते. इतक्या लहान बाळावर शस्त्रक्रिया करणे काहीसे धोकादायक असल्याचे या डॉक्टरांकडून सांगण्यात येत होते. याबाबत रुग्णालयातील लहान मुलांचे हृदयरोगतज्ज्ञ असलेले डॉ. नीरल अग्रवाल म्हणाले, या समस्येमुळे हे बाळ काहीही खात-पीत नव्हते. त्याला छातीतल सतत संसर्ग होत होता. योग्यप्रकारे श्वास घेता येत नसल्याने त्याचा विकासही होत नव्हता असे त्यांनी सांगितले. मात्र या मुलाची शस्त्रक्रिया केल्याशिवाय पर्याय नव्हता, त्यामुळे शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. डॉ. राजा जोशी यांनी ही शस्त्रक्रिया केली आणि त्यासाठी एकूण ६ तासांचा वेळ लागला. ही शस्त्रक्रिया वेळेत झाली नसती तर पुढे धोका उद्भवला असता असेही या डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे मूळचा पाकिस्तानी असलेला जगदीश राम आता भारतातून यशस्वीपणे शस्त्रक्रिया करुन काही दिवसांतच पुन्हा आपल्या देशात जाईल.