breaking-newsआंतरराष्टीय

११ हजार ४०० कोटींचा पीएनबी घोटाळा नक्की आहे तरी काय?

पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार ४०० कोटींचा चुना लावून पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला लंडन येथून अटक करण्यात आली आहे. भारतात घोटाळा करुन नीरव मोदी दीड वर्षांपासून फरार झाला होता. नीरव मोदीविरोधात लंडनमधील वेस्ट मिनिस्टर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. हे अटक वॉरंट जारी केल्यानंतर दोन दिवसात नीरव मोदीला पोलिसांनी अटक केली आहे. आता नीरव मोदीला भारताच्या ताब्यात देण्यासाठी प्रत्यार्पण प्रकरणाची सुनावणी न्यायालयात केली जाणार आहे. नीरव मोदीला झालेली अटक ही भारत सरकारचे मोठे यश असल्याचे मानले जात आहे. मात्र नीरव मोदीने केलेला पीएनबी घोटाळा काय होता हे अनेकांना ठाऊक नाही. चला तर जाणून घेऊयात नक्की काय आहे हे पीएनबी घोटाळा प्रकरण…

१५० ‘चैन पत्रे’ ठरली पीएनबी घोटाळ्याचे मूळ

अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचे कुटुंबीय बँकेला गंडा घालून २०१७ साली डिसेंबर महिन्यात देशाबाहेर फरार झाले. त्याने केलेल्या ११,४०० कोटींच्या या घोटाळ्याचे मूळ हे पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील शाखेतून दिली गेलेली तब्बल १५० ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग (एलओयू)’ अर्थात ‘चैन पत्रा’तच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेली अनेक वर्षे सर्रास शिजत असलेल्या या गैरव्यवहाराचा उलगडा झाला तो नीरव मोदी समूहातील कंपन्या आणि गीतांजली जेम्स याची न मिटणाऱ्या पैश्याच्या हाव्यासापोटीच. नीरव मोदी यांच्या तीन कंपन्या आणि गीतांजली जेम्सचे पंजाब नॅशनल बँकेच्या या शाखेत चालू खाते होते. ज्या भ्रष्ट बँक अधिकाऱ्याच्या संगनमताने हे गैरव्यवहार चालत तो निवृत्त झाल्यावर, त्या जागी आलेल्या नव्या अधिकाऱ्याकडे या कंपन्यांनी तोवर चालत आलेल्या प्रथेप्रमाणे ‘एलओयू’ची मागणी केली. तथापी असे यापूर्वी कोणतेही पत्र दिले असल्याच्या नोंदी नसल्याने हे काळे-बेरे नेमके काय त्याचा शोध सुरू झाला. बँकेनेच तपास यंत्रणांना दिलेल्या माहितीप्रमाणे, गेल्या काही वर्षांत अशी १५० ‘चैन पत्रे’ घेऊन हा बँकिंगमधील आजवरचा सर्वात मोठा घडला असल्याचे स्पष्ट झाले.

पीएनबी घोटळ्याचे स्वरूप नेमके कसे?

नीरव मोदी आणि त्याच्या कंपन्या परदेशातील कंपन्यांकडून कच्चे हिरे घेत आणि या विक्रेत्यांना विदेशी चलनात मोबदला द्यावा लागत असे.

या कच्चे हिरे विक्रेत्यांचे भारतीय बँकांच्या विदेश शाखांमध्ये खाती होती.

पंजाब नॅशनल बँकेतून नीरव मोदी अनधिकृतरीत्या ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग (एलओयू)’ मिळवून, बँकेच्या विदेश शाखेतून अल्पमुदतीचे कर्ज मिळवून विक्रेत्यांची रक्कम चुकती करीत असे.

हे एलओयू म्हणजे कर्ज हवे असलेल्या व्यक्तीच्या योग्यतेची म्हणजे त्याने त्या बदल्यात उचललेल्या कर्जाची पंजाब नॅशनल बँकेने दिलेली हमीच होती.

बँकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्याकडून मन मानेल तसे हे पत्र मिळविले जाई आणि त्या बदल्यात भारतीय बँकांच्या विदेश शाखेतून कर्ज उचल करून विक्रेत्यांना पैसे दिले जात असत.

उल्लेखनीय म्हणजे अशा अनधिकृत व्यवहारांची बँकेच्या केंद्रीकृत यंत्रणेत (सीबीएस) मध्ये नोंद केली जात नसे, त्याऐवजी बँकांत वापरात येणारी जागतिक वित्तीय व्यवहारासाठी सूचनेची सॉफ्टवेअर प्रणाली म्हणजेच ‘स्विफ्ट’मध्ये त्याची नोंद केली जात असे. यामुळे बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापन या व्यवहारांबाबत अनभिज्ञच होते.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्देशाप्रमाणे, ‘एलओयू’मार्फत होणाऱ्या पतपुरवठा अल्पमुदतीचा आणि ९० दिवसांमध्ये त्याची परतफेड व्हायला हवी. तरी भारतीय बँकांच्या विदेश शाखांनीही या नियमाचा भंग करून वर्षभराच्या कालावधीसाठी कर्ज दिल्याचेही उघडकीस आले.

भारतीय बँकांच्या ३० विदेश शाखांना मिळून हा ११,४०० कोटींचा गंडा घातला गेला आहे, तरी ‘एलओयू’ देणारी बँक म्हणून पंजाब नॅशनल बँकेवरच त्याचे दायीत्व येते.

गाजलेल्या बँक गैरव्यवहारांनाही मागे टाकले

पीएनबी घोटाळ्याआधीही १ लाख रुपयांवरील आर्थिक घोटाळ्याच्या प्रसंगांना अनेक सरकारी तसेच खासगी बँकांना सामोरे जावे लागले होते. अर्थातच हे गैरव्यवहार संबंधित बँकांचे कर्मचारी, वरिष्ठ अधिकारी यांच्या मध्यस्थाद्वारे झाले. पैकी अनेक प्रकरणात थेट बँकेच्या संचालक पदावरील व्यक्तीलाही कारवाईकरिता सामोरे जावे लागले होते.

एकटय़ा किंगफिशर एअरलाईन्सला दिलेल्या बुडित कर्जामध्ये देशातील १७ हून अधिक बँकांचे ताळेबंद पोळले गेले. त्यांची एकत्रित ९,५०० कोटी रुपयांची रक्कम अद्यापही बँकेच्या जमा बाजुस आलेली नाही.

पीएनबी बँक घोटाळा केवळ देशातील बँकच नव्हे तर एकूणच आर्थिक घोटाळ्यांवर वरचढ ठरणारा आहे. भांडवली बाजाराशी संबंधित केतन पारेख (सन २००१, १३७ कोटी रुपये), हर्षद मेहता (सन १९९८, ४९९९ कोटी रुपये) तसेच ताळेबंद फुगवल्याची स्वत:हून कबुली देणाऱ्या सत्यम कम्प्युटर्स २००९, ७,१३६ कोटी रुपये) या आर्थिक घोटाळ्यांनाही मागे टाकणारा पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा असल्याचे स्पष्ट होते.

आत्तापर्यंतचे सर्वात मोठे बँक घोटाळे (कंसात घोटाळ्याला निमित्त)

२०१८ – पंजाब नॅशनल बँक – ११,४०० कोटी रुपये (नीरव गुप्ता व कुटुंबिय)

२०१८ – आंध्र बँक – ५०० कोटी रुपये (गुजरातस्थित औषधनिर्माण कंपनी)

२०१७ – आयडीबीआय – ९,५०० कोटी रुपये (किंगफिशर एअरलाईन्स व विजय मल्या)

२०१६ – सिंडिकेट बँक – १,००० कोटी रुपये (चार व्यक्तींमार्फत ३८६ बनावट बँक खाती)

२०१५ – सेंटल बँक ऑफ इंडिया – २,११२ कोटी रुपये (जैन इन्फ्राप्रोजेक्टच्या कर्मचाऱ्यांमार्फत)

२०१४ – सेंटल बँक ऑफ इंडिया व सिंडिकेट बँक – ८,७०० कोटी रुपये (गुजरातस्थित औषधनिर्माण कंपनी)

जागतिक हिरे व्यापारी ते आर्थिक घोटाळेबाज

आर्थिक घोटाळा करून पसार झालेला अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी याला खरे तर संगीत क्षेत्रात चमकदार कामगिरी करून दाखवायची होती. म्हणूनच कदाचित मुंबईतील ऐतिहासिक ‘ऱ्हिदम हाऊस’ त्याने विकत घेतले होत. नीरव मोदी फरार होण्याआधी आणि हा घोटाळा समोर येण्याआधी ऱ्हिदम हाऊसमध्ये मोदीच्या हिरे कंपनीची ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसीडर असणाऱ्या प्रियांका चोप्राचे भलेमोठे पोस्टर लागलेले होते. काळाच्या ओघात नीरवची संगीत आवड मागे पडली. मग कुटुंबाच्या परंपरागत हिरे उद्योगात त्याने उडी घेतली. नीरवचे वडीलही हिरे व्यापारीच होते. हिरे उद्योगाची राजधानी मानल्या गेलेल्या बेल्जियममधील अ‍ॅण्टवर्पमध्ये नीरवचा जन्म झाला असला तरी तो अमेरिकेतील विद्यापीठातील शिक्षण सोडून मुंबईत परतला आणि हिरे जगातामध्ये नाव कमावयाचा त्याने ध्यास घेतला.

गीतांजली जेम्स ग्रुप कंपनी नीरवच्या मामांची. तिथे नऊ वर्षांची उमेदवारी करून नीरवने स्वत:चा उद्योग सुरू करण्याचा निर्धार केला. गीतांजली जेम्सचे अध्यक्ष आणि नीरवचे मामा मेहुल चोक्सी हेही पीएनबी घोटाळ्यातील आरोपी आहेत.

नीरवने हिरे आयात करण्याचा उद्योग सुरू केला. अर्थातच पुढची पायरी हिऱ्याला पैलू पाडून दागिने हीच होती. २००९ मध्ये नीरवने पैलू पाडायला सुरुवात केली. त्यानंतर थोडय़ाच काळात नीरव जगभरात नामांकित झाला. ४७ वर्षांचा नीरव दशकभरात अब्जाधीश बनला. २०१४ मध्ये फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदा समावेश झाला. खरे तर त्याच वर्षी तो अर्थविषयक तपास यंत्रणाच्या रडारवर आला होता. महसूल तपास संचालनालयाने नीरवची चौकशीही केली होती.

२०१० मध्ये नीरवच्या गोळकोंडा हिऱ्यांचा हार हाँगकाँगच्या लिलावात ३.५६ दशलक्ष डॉलरला विकला गेला. त्यानंतर वैविध्यपूर्ण रचनेचे अत्यंत किमती हार जगभर विकले गेले. हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री केट विन्स्लेटपासून जगभरातील विविध क्षेत्रांतील वलयांकित नीरवच्या हिऱ्यांच्या दागिन्यांचे ग्राहक बनले.

न्यूयॉर्कपासून मकाऊपर्यंत नीरवच्या हिरे दागिन्यांच्या ब्रॅण्डची आलिशान दुकाने उघडली गेली. भल्यामोठय़ा जाहिरातींची पोस्टर्स लावली गेली. जाहिरात करणारी मंडळीही वलयांकितच होती. प्रियांका चोप्राने पीएनबी प्रकरण उघडकीस आल्यानंतर नीरवच्या विरोधात दावा दाखल केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button