हातभट्टीतील विषारी दारुमुळे ८० जणांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/Assam-hooch-Tragedy.jpg)
आसाममध्ये हातभट्टीतील विषारी दारुचे सेवन केल्याने चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या ८० कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केली असून देवेन बोरा आणि इंद्रोकल्प बोरा अशी या आरोपींची नावे आहे.
गुवाहाटीजवळील गोलाघाट येथील चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांनी गुरुवारी रात्री सालमोरा टी इस्टेट येथील देशी दारुच्या दुकानातून दारु विकत घेतली होती. यानंतर विषारी दारुचे सेवन करणाऱ्यांची प्रकृती खालावली. यात गोलाघाट येथील सलमारा आणि जोरहाटमधील बोरघोला आणि तिताबोर येथील कामगारांचा समावेश आहे. जोरहाट रुग्णालयात ४५ जणांचा मृत्यू झाला असून २२१ जणांवर उपचार सुरु आहेत. तर गोलाघाट येथील सरकारी रुग्णालयात ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णालयात ९३ जणांवर उपचार सुरु आहेत. या घटनेची दखल आसाम सरकारनेही घेतली असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी दोन अधिकाऱ्यांना निलंबित देखील करण्यात आले आहे.