सुशीलकुमार मोदी मानहानी प्रकरणात राहुल यांना जामीन
आडनावाच्या संदर्भात आर्थिक गुन्ह्यांतील आरोपींचा उल्लेख केल्याचे प्रकरण
भाजपचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यात राहुल गांधी शनिवारी येथील न्यायालयात हजर झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. रा. स्व. संघाची कथित निंदानालस्ती केल्याच्या प्रकरणात राहुल यांना खटल्याला सामोरे जावे लागेल, असा निर्णय मुंबईच्या एका न्यायालयाने दिल्यानंतर दोन दिवसांनी ही घडामोड झाली आहे.
अलीकडेच पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले राहुल हे खासदार व आमदार यांच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश असलेले अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी कुमार गुंजन यांच्यापुढे हजर झाले असता न्यायाधीशांनी त्यांना जामीन मंजूर केला. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी न्यायालयाने ८ ऑगस्ट ही तारीख निश्चित केल्याचे सुशीलकुमार मोदी यांचे वकील शंभू प्रसाद यांनी सांगितले.
‘सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय असते?’ असा प्रश्न राहुल यांनी एप्रिल महिन्यात निवडणूक प्रचारादरम्यान विचारल्याबद्दल सुशीलकुमार मोदी यांनी त्यांच्याविरुद्ध बदनामीचा खटला दाखल केला आहे.
राहुल यांच्या बोलण्याचा संदर्भ पंतप्रधान नरेंद्र मोदी, बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी व आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्याशी होता. आपलेही आडनाव हेच असल्यामुळे, गांधी यांच्या वक्तव्यामुळे आपण वैयक्तिकरीत्या व्यथित झालो असल्याचे सुशीलकुमार मोदी यांनी म्हटले होते.
आम्ही जामिनाला विरोध केला नाही. न्यायालयाने राहुल यांना त्यांच्याविरुद्धचा आरोप समजावून सांगितला आणि त्यांना तो मान्य आहे की नाही, असे विचारले. राहुल यांनी याचे उत्तर नकारार्थी दिले आणि न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी ८ ऑगस्टला ठेवली, असे प्रसाद म्हणाले.
नरेंद्र मोदी सरकार, तसेच भाजप- संघ यांच्याविरुद्ध आवाज उठवल्यानेच आपल्याला लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप राहुल यांनी न्यायालयाच्या परिसरात प्रतीक्षा करत असलेल्या पत्रकारांशी बोलताना केला आणि हा लढा सुरू ठेवण्याचा निश्चय व्यक्त केला.
‘राजीनामा मागे घ्या, नाहीतर आत्मदहन’
राज्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मदनमोहन यांनी राहुल यांचे विमानतळावर स्वागत केले. न्यायालयाच्या आवारात काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी केली, नाही तर सदाकत आश्रम या ऐतिहासिक ठिकाणी आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला.