सुरेश प्रभुंचे एअरबसला भारतात निर्मीतीचे आवाहन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/suresh-prabhau-airbus-.jpg)
नवी दिल्ली – भारताचे नागरी विमान वाहतूक खात्याचे मंत्री सुरेश प्रभु यांनी एअरबस या आंतरराष्ट्रीय विमान निर्मीती करणाऱ्या कंपनीला भारतात विमान निर्मीती करण्याचे आवाहन केले आहे. भारत सरकारने मेक ईन इंडिया हे धोरण स्वीकारले असून त्याच लाभ या कंपनीला होऊ शकतो तसेच भारतात विमान वाहतूक क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याचाहीं लाभ या विमान कंपनीला घेता येईल असे त्यांनी म्हटले आहे.
सुरेश प्रभु यांनी फ्रांस येथील एअरबस कंपनीच्या तौलौसे येथील प्रकल्पाला भेट दिली. त्यावेळी कंपनीला त्यांनी हे आवाहन केले. ते म्हणाले की या कंपनीने भारतात हा प्रकल्प उभा करण्याचा निर्णय घेतला तर दोन्ही बाजूंना त्याचा लाभ होईल आणि भारतातही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती सुरू होईल असे ते म्हणाले. मी त्यांना मेक ईन इंडिया योजनेबाबत इम्प्रेस केले आहे असे प्रभु यांनी नंतर आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे. सध्या भारतात 300 एअर बस विमाने उड्डाण करीत असून भारतीय विमान कंपन्यांनी अजून एकूण 530 विमानांची ऑर्डर दिली आहे.
आपण लवकरच एअरबस कंपनीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना भेटून त्यांना भारतात विमान प्रकल्प सुरू करण्याची विनंती करणार आहोत असे प्रभु यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. पुढील 20 वर्षात भारताला किमान 1750 विमाने लागणार आहेत असा अंदाज आहे. त्याची किंमत सध्याच्या भावाने किमान 255 अब्ज डॉलर्स इतकी आहे.