समलैंगिक संबंधात अडथळा, पत्नीची केली हत्या, आयफोन अॅपने फोडले बिंग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Jessica-Patel-and-husband.jpg)
ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या समलैंगिक जोडीदारासोबत राहता यावे यासाठी पत्नीची हत्या करणाऱ्या भारतीय वंशाच्या पतीला इंग्लंडमधील न्यायालयाने दोषी ठरवले आहे. मितेश पटेल (वय ३७) असे या आरोपीचे नाव असून मितेशच्या आयफोनमधील हेल्थ अॅपमुळे त्याचे बिंग फुटले आहे. हा अॅप महत्त्वाचा पुरावा ठरला असून मितेशने चोरट्यांनी पत्नीची हत्या केल्याचा कांगावा केला होता.
मिडल्सब्रो येथे राहणाऱ्या मितेश पटेलने मे महिन्यात पत्नीची हत्या केली होती. सुरुवातीला मितेशने घरात चोरटे घुसल्याचा कांगावा केला होता. हे सर्व खरे वाटावे यासाठी त्याने घरातील कपाटातील कपडे बाहेर काढून फेकले होते. पण मोबाईलमधील हेल्थ अॅपने त्याचे हे बिंग फोडले.
मितेश आणि जेसिकाच्या लग्नाला सहा वर्षे झाली होती. दोघेही फार्मासिस्ट म्हणून काम करायचे. पण मितेश वैवाहिक आयुष्यात आनंदात नव्हता. तो समलैंगिक होता. मात्र, दबावापोटी त्याने जेसिकाशी लग्न केले होते. लग्नानंतरही मितेशचे डेटिंग अॅपद्वारे अनेक पुरुषांच्या संपर्कात होता. यातील काही जण त्याच्या घरी देखील आले होते. यादरम्यानच्या काळात मितेश डॉ. अमित पटेलच्या संपर्कात आला. अमित कालांतराने ऑस्ट्रेलियातील सिडनीत राहायला गेला. मितेशलाही अमितसोबत सिडनीत राहायचे होते. यासाठी त्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला. जेसिकाला मितेशच्या समलैंगिक संबंधांची माहिती होती, मात्र तिनेही कधीच याची बाहेर वाच्यता केली नाही.
पोलीस तपासात त्याने गुगलवर ‘पत्नीची हत्या कशी करायची’, असं सर्च देखील केल्याचे स्पष्ट झाले. १४ मे रोजी मितेशने पत्नीचा काटा काढला. संशय येऊ नये म्हणून हत्या केल्यानंतर तो घराबाहेर गेला. ‘मी वॉकला बाहेर गेलो आणि येताना खाद्यपदार्थ घेऊन आलो. यादरम्यान चोरट्यांनी घरात घुसून पत्नीची हत्या केली’, असा कांगावा त्याने केला.
पोलिसांनी या हत्या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली. जेसिका आणि मितेश या दोघांच्य आयफोनमध्ये हेल्थ अॅप आहे. पोलिसांनी या दोघांचे हेल्थ अॅप तपासले असता पतीच्या जबाबातील तफावत समोर आली.
१४ मे रोजी घराच्या हॉलमध्ये त्याने पत्नीची हत्या केली. हत्येनंतर तो बाहेर गेला होता. बाहेरुन घरी परतल्यावर तो वरच्या खोलीत गेला. त्याने कपाटातील कपडे बाहेर काढून फेकले. सामान अस्ताव्यस्त केल्यास चोरटे घरी आले होते या दाव्यात तथ्य वाटेल, असे मितेशला वाटत होते. हेल्थ अॅपमध्ये त्याच्या या हालचालींची नोंद झाली. तर पत्नीच्या हेल्थ अॅपमधूनही मितेशचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले. १४ मे रोजी संध्याकाळी ७ वाजून ४४ मिनिटांनी १४ पावले चालल्याची नोंद जेसिकाच्या हेल्थ अॅपमध्ये झाली होती. त्याच वेळी मितेश पत्नीची हत्या झाली हे सांगण्यासाठी घराबाहेर आला होता. यानंतर त्याने घराबाहेर फोन फेकून दिला. हा फोन नंतर तपास अधिकाऱ्यांना सापडला होता. त्याच्या अगोदर बरेच तास फोन मोशनलेस होता हे देखील स्पष्ट झाले. या सर्व तांत्रिक बाबींची सांगड घालत पोलिसांनी न्यायालयात भक्कम पुरावे सादर केले. युकेमध्ये हत्या प्रकरणात न्यायालयात हेल्थ अॅपचा पुरावा म्हणून वापर झाल्याची ही पहिलीच घटना असावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.