सप-बसपचा काडीमोड?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/Akhilesh-Maya-1.jpg)
समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची आघाडी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीतही कायम राहील, असे लोकसभा निवडणुकीआधी जाहीर करणाऱ्या बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सोमवारी स्वबळाचे संकेत दिले. त्यामुळे बसपची समाजवादी पक्षासोबतची आघाडी संपुष्टात आल्याचे मानले जाते.
लोकसभा निवडणूक बसप आणि समाजवादी पक्षाने एकत्र लढविली होती. गोरखपूर आणि फूलपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र आले होते. सुमारे दोन दशकांपूर्वी समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लखनऊच्या शासकीय विश्रामगृहात केलेल्या हल्ल्याची घटना विसरून एकत्र आल्याचे मायावती यांनी जाहीर केले होते. सप-बसपची आघाडी ही आगामी विधानसभा निवडणुकीतही कायम राहील, अशी ग्वाही मायावती यांनी दिली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात सप-बसप आघाडी अपयशी ठरली. ८० पैकी बसपचे १० तर समाजवादी पक्षाचे पाच असे १५ उमेदवार निवडून आले. समाजवादी पक्षाच्या तुलनेत बसपला चांगले यश मिळाले.
समाजवादी पक्षाची यादव ही पारंपरिक मतपेढी हस्तांतरित झाली नाही, असा मायावती यांचा आक्षेप आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या ताकदीवर यश मिळाल्याचे मायावती यांनी सोमवारी पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत सांगितले. मायावती यांच्या या विधानावरून त्यांनी समाजवादी पक्षाची मदत झाली नाही, हेच अधोरेखित केले.
उत्तर प्रदेशात विधानसभेच्या ११ जागांसाठी पोटनिवडणुका होतील. भाजपचे नऊ तर समाजवादी आणि बसपचा प्रत्येकी एक असे एकूण ११ आमदार लोकसभेवर निवडून आले आहेत. पोटनिवडणूक लढण्यासाठी तयारीत राहा, असा आदेशच मायावती यांनी पक्षाच्या नेत्यांना दिला. बसप पोटनिवडणुका लढवत नाही. पण, या वेळी स्वबळावर ताकद आजमाविण्याचा मायावती यांचा प्रयत्न असल्याचे मानले जाते. दलित, मुस्लीम हे समीकरण अधिक घट्ट करून भाजपला पर्याय म्हणून रिंगणात उतरण्याची मायावती यांची योजना आहे.