संयुक्त राष्ट्रांतर्फे दिवाळीनिमीत्त विशेष टपाल तिकीट
संयुक्त राष्ट्र – संयुक्त राष्ट्रांतर्फे दिवाळी निमीत्त दोन विशेष टपाल तिकीटे काढण्यात आली आहेत. त्याची संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयातील टपाल कार्यालयात आज पासून विक्री सुरू करण्यात आली. भारतीय परंपरेतील दिवाळीचा सण हा प्रकाशाचा अंधारावरील विजयाचा सण आहे. तो संयुक्त राष्ट्रांनी अशा अभिनव पद्धतीने साजरा केला आहे. ही तिकीटे प्रत्येकी 1.15 डॉलर्सची आहेत. आंतरराष्ट्रीय एअरमेल टपालासाठी ती वापरण्यात येतील.
संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात प्रत्येकी दहा तिकीटांच्या संचात त्याची विक्री सुरू करण्यात आली आहे. यानिमित्त संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात दिव्यांचीही रोषणाई करण्यात आली आहे. गेल्या महिन्यातच या तिकीटांचे अधिकृत प्रकाशन झाले होते पण त्याची प्रत्यक्ष विक्री आता संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात सुरू झाली असून ऑनलाईन पद्धतीनेही या तिकीटांची विक्री करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे कायम राजदूत सय्यद अकबरूद्दीन यांनी याबद्दल संयुक्त राष्ट्रांचे आभार मानले आहेत. दीपोत्सवानिमित्त संयुक्त राष्ट्रांनी केलेला हा एक स्पृहणीय उपक्रम आहे, असे त्यांनी म्हटले आहे.