संभाजीराजेंनी दिले मोदींसह सेलिब्रिटींना अडचणीत आणणारे ‘फिटनेस चॅलेंज’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/sambhajiraje.jpg)
कोल्हापूर : शिवराज्यभिषेक दिन सोहळ्यात पायी रायगड चढण्याचे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते केंद्रीय मंत्री, अधिकारी आणि अभिनेते यांना केले आहे. पायी या आणि आपला ‘फिटनेस’ सिध्द करा असे आवाहन केल्याने याची चर्चा सुरू झाली आहे.
केंद्रीय मंत्री राजवर्धन राठोड यांनी ‘हम फिट तो इंडिया फिट’ या हॅशटॅगने ‘फिटनेस चॅलेंज ‘सुरु केलं. त्यानंतर ‘हम फिट तो इंडिया फिट’हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड होत आहे. खासदार संभाजीराजेंनी देखील रायगड पायी चढण्याचे आवाहन केले आहे. दरवर्षी सहा जून रोजी रायगडावर राज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. खासदार संभाजीराजे त्यासाठी सक्रीय पुढाकार घेतात. यावेळी सोहळ्यासाठी त्यांनी स्वत:चा आणि शिवभक्तांचा पायी चालत रायगडावर जातानाचा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आहे.
त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री राजवर्धन राठोड, किरण रिजिजू, कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे, अभिनेता आमीर खान, अक्षयकुमार, अजय देवगण, रितेश देशमुख यांनाही यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पाच जून रोजी दुपारी तीन वाजता माझ्यासोबत किल्ले रायगडावर चला, असे त्यांनी सुचवले आहे. पायथ्यापासून माथ्यापर्यंत पंधराशेपेक्षा जास्त पायऱ्या चढत किमान अडीच तासांचा पायी प्रवास अनेकांच्यादृष्टीने आव्हान असणार आहे.