शिकागोतील गोळीबारात 12 ठार
शिकागो – अमेरिकेतील तिसरे मोठे शहर असणाऱ्या शिकागो मध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेत बारा जण ठार झाले आहेत. अंतर्गत टोळी युद्धातून हा गोळीबार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यात ठार झालेले बहुतांशी लोक टोळीशीच संबंधीत आहेत. अनेक तास हा गोळीबार सुरू होता. त्यात एकूण 66 जणांवर गोळ्या झाडण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातील चाळीस जण जखमी झाले आहेत. त्या चकमकीच्यावेळी तेथे रस्त्यावर उभे असलेलेही काहीं जण बळी पडले आहेत. शुक्रवारी सायंकाळ पासून रविवारी रात्री पर्यंत प्रतिस्पर्धी टोळ्यांमध्ये ही गोळीबाराची चकमक सुरू होती.
विशेष म्हणजे शिकागोतील गोळीबाराच्या प्रमाणात यंदा बऱ्याच अंशी घट झाल्याचे सांगण्यात आले असतानाच हा प्रकार घडला आहे. शिकागोत गोळीबाराच्या घटनांमध्ये आत्ता पर्यंत 320 जणांचे बळी गेले आहेत. अमेरिकेत गोळीबार करणाऱ्यांना फारशा कडक शिक्षा होत नाहीत. जरी हे गोळीबार करणारे पकडले गेले तरी नंतर ते लगेच सुटतात आणि पुन्हा ते रस्त्यावर येऊन गोळीबार करतात असे आढळून आले आहे त्यामुळे या समस्येचा कसा सामना करायचा हा पोलिसांपुढील मोठा प्रश्न आहे.
दरम्यान शिकागोत झालेल्या या गोळीबाराच्या प्रकरणात पोलिसांनी 46 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एकूण 60 स्वयंचलीत बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. शिकागो शहरात या वर्षी जप्त करण्यात आलेल्या बंदुकांची संख्या 5600 झाली आहे. शिकागोच्या शेजारील राज्यात बंदुका विकत घेण्याविषयीचे कायदे अत्यंत तकलादू आहेत त्यामुळे तेथून बंदुका विकत घेऊन त्या शिकागोत पाठवल्या जातात असे पोलिसांचे म्हणणे आहे.