शक्तिकांता दास आरबीआयला ‘इतिहासजमा’ करणार नाहीत ही अपेक्षा; भाजपा नेत्यानंच उडवली खिल्ली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Shaktikanta-Das.jpg)
रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर शक्तिकांता दास यांच्या शिक्षणावरुन गुजरातमधील भाजपा नेते जय नारायण व्यास यांनी खिल्ली उडवली आहे. शक्तिकांता दास यांची इतिहासात एमए केले असून ते रिझर्व्ह बँकेला ‘इतिहासजमा’ करणार नाहीत हीच अपेक्षा, असे व्यास यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे व्यास हे नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात होते.
रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी अर्थतज्ज्ञाऐवजी केंद्रीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. यानुसार उर्जित पटेल यांच्या जागी शक्तिकांता दास यांची नियुक्ती करण्यात आली. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी अर्थशास्त्रात पीएचडी मिळवलेल्या व्यक्तींची निवड करण्यात आली होती. मात्र, नवनियुक्त गव्हर्नर शक्तिकांता दास हे आयएएस अधिकारी असून त्यांनी इतिहासात एमए केले आहे. यावरुन सोशल मीडियावरुन टीका देखील करण्यात आली होती. यात भर म्हणजे गुजरातमधील भाजपा नेते व्यास यांनी देखील शक्तिकांता दास यांच्या पदवीवरुन खिल्ली उडवली. ‘नवनियुक्त गव्हर्नर दास यांनी इतिहासात एमए केले आहे. आता ते रिझर्व्ह बँकेला इतिहास जमा करणार नाही हीच अपेक्षा आणि प्रार्थना करुया’, असे त्यांनी म्हटले आहे. शक्तिकांता दास हे १९८० च्या बॅचमधील आयएएस अधिकारी असून दिल्ली विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतले आहे.