व्हॉट्सअॅपपासून सावध रहा! लष्कराचा जवानांना अतिमहत्वाचा इशारा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/social-media-new_20180478526.jpg)
सोशल मीडियामुळे माहितीची गोपनीयता आता जवळपास नष्टच झाली आहे. एखादी अतिमहत्वाची माहितीही आता सोशल मीडियातून नकळत सार्वजनिक होऊन जाते. याचा सर्वाधिक धोका आणि काळजी संरक्षण विषयक माहितीबाबत घेतली जाते. त्यामुळे आता भारतीय लष्करानेही आपल्या जवानांना आणि अधिकाऱ्यांना व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करताना सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
शत्रुच्या गुप्तचर यंत्रणा अतिमहत्वाची माहिती काढून घेण्यासाठी आता सोशल मीडियाचा खुबीने वापर करीत आहेत. त्यामुळे आपल्या सैन्याबाबतची माहिती अजाणतेपणानेही लीक होऊ नये यासाठी लष्कराने आपल्या सर्व कर्माचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांना व्हॉट्सअॅपवर अतिअॅक्टिव्ह राहू नका असा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअॅपचे जे मोठे ग्रुप आहेत त्यावर चर्चा करताना तर विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण, अशा ग्रुपमध्ये बरेच लोक आपल्या ओळखीचे नसतात.
जवानांना असा इशारा देताना डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सने (डीजीएमओ) म्हटले की, शत्रूच्या गुप्तचर यंत्रणा या अधिक हुशार असतात. त्यांच्याकडे माहितीचे विश्लेषण करण्याची मोठी क्षमता असते तसेच एखादी माहिती तुम्हाला कळणार नाही अशा पद्धतीने सहज काढून घेऊ शकतात. त्यामुळे शक्यतो सोशल मीडियावर जास्त काळ राहू नका. सोशल मीडिया हा सुरक्षीत नाही, त्यामुळे जर अशा प्रकारे कोणी कर्मचारी आपल्या वैयक्तिक फोनवरुन व्हॉट्सअॅपद्वारे कार्यालयीन माहिती पाठवताना आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे डीजीएमओने म्हटले आहे.
डीजीएमओने पुढे म्हटले की, लष्करातील कोणत्याही व्यक्तीने सोशल मीडियावर आपली ओळख उघड करु नये, कुठल्याही उपकरणांचे फोटो सोशल मीडियावर टाकू नयेत, त्याचबरोबर इतर महत्वाची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करु नये. त्याचबरोबर अशा प्रकारची गोपनीय माहिती काढून घेण्यात सराईत असलेल्या हनीट्रॅपपासून स्वतःचा बचाव करावा.
नुकतेच जून महिन्यात लष्कराला हे आढळून आले होते की, एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पाकिस्तानी मुलगी भारतीय लष्करी अधिकाऱ्यांना आणि विशेष दलाच्या जवानांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होती. तसेच महू येथे एका जवानाला लष्कराची गोपनीय माहिती एका पाकिस्तानी लोकांशी शेअर केल्याच्या आरोपखाली अटकही झाली होती, हा जवानही हनीट्रॅपचा शिकार झाला होता. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातही उत्तर प्रदेशातून एटीएसने एका बीएसएफ जवानाला अटक केली होती. तो पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या हनीट्रॅपमध्ये अडकला होता. यावेळी त्याने पोलीस अकॅडमी, युनिटचे कामकाजाचे डिटेल्स आणि ट्रेनिंग सेंटरची माहिती शेअर केली होती.