“व्हीव्हीपॅट’चा निवडणूकीतील वापर उपयुक्त
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/vvpat-1-1.jpg)
- केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे निवडणूक आयुक्तांच्या गोलमेज परिषदेत एकमत
नवी दिल्ली – केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे आज माजी मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेला एम.एस.गिल, जे.एम.लिंगडोह, टी.एस.कृष्णमुर्ती, बी.बी.टंडन, डॉ. एस.वाय.कुरेशी, व्ही.ए.संपत, एच.आर.ब्रम्हा, डॉ.नसिम झैदी आणि माजी निवडणूक आयुक्त जी.व्ही.जी.कृष्णमूर्ती यांचा समावेश होता. मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी.रावत तसेच निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा आणि अशोक लवासा यांनी सर्व माजी आयुक्तांचे स्वागत केले.
या परिषदेत ईव्हीएम / व्हीव्हीपॅटचा मतदान प्रक्रियेतील वापर उपयुक्त असल्याबाबत एकमत झाले. मात्र त्याबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये जनजागृतीची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. मतदारांना या यंत्रणेबाबत साक्षर केल्यास, त्याबाबत मतभेद उरणार नाहीत, असे मत नोंदवण्यात आले.
निवडणूक प्रचारादरम्यान तिरस्कार दर्शक वक्तव्ये सातत्याने केली जातात आणि त्यामुळे राजकीय वातावरण दुषित होते, त्यामुळे सार्वजनिक हित लक्षात घेत, अशा प्रकारच्या वक्तव्यांवर तातडीने नियंत्रण आणण्याची गरज या परिषदेत व्यक्त करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित इतरही अनेक मुद्यांबाबत या परिषदेत चर्चा करण्यात आली.