व्हाईट हाऊसमधील माहिती फोडणारे देशद्रोही आणि भ्याड – डोनॉल्ड ट्रम्प
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/donald-696x392-1.jpg)
वॉशिंग्टन (अमेरिका) – संतप्त डोनॉल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील माहिती फोडणारे देशद्रोही आणि भ्याड आहेत, असे ट्विट आज केले आहे. व्हाईट हाऊसमधील तथाकथित फुटलेल्या बातम्या मीडिया प्रचंड प्रमाणावर मीठमसाला घालून “फेक न्यूज’च्या स्वरूपात पसरवतो. यामागे आम्हाला बदनाम करणे, आम्ही वाईट आहोत असे दाखवणे हाच हेतू असतो, असे त्यांनी म्हटले आहे.
अशा प्रकारे व्हाईट हाऊसमधील अंतर्गत चर्चा आणि माहिती फोडणारे लोक हे देशद्रोही आहेत, भ्याड आहेत आणि आम्ही त्यांचा शोध घेतल्याखेरीज राहणार नाही, असे ट्रम्प यांनी ट्विट केले आहे. मेंदूचा कॅन्सर झालेले सिनेटर जॉन मॅक्केन यांच्याबद्दल व्हाईट हाऊसमधील एक संपर्क कर्मचारी केली सॅंडलर हिने केलेल्या असभ्य वक्तव्याची माहिती बाहेर फुटल्यानंतर ट्रम्प यांनी हे ट्विट केले आहे.
गेल्या आठवड्यात सिनेटर जॉन मॅक्केन यांनी सीआयए संचालकपदासाठी जिना हॅस्पेल यांच्या नावाला विरोध केला होता. त्याबाबत प्रतिक्रिया देताना केली सॅंडलरने म्हटले होते, की ते (सिनेटर जॉन मॅक्केन) नाही तरी मरणारच आहेत, त्यांच्या बोलण्याला महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. मात्र त्यानंतर केली सॅंडलरने आपल्या बेजबाबदार वक्तव्याबद्दल मॅक्केन कुटुंबीयांची माफी मागितली होती.