व्यवसाय सुलभतेच्या क्रमवारीत भारत १४० हून १०० व्या स्थानी पोहोचला – नरेंद्र मोदी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/modi-pm-pti.jpg)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जपानी उद्योगपतींना भारतासोबत जास्तीत जास्त व्यापार आणि व्यावसायिक संबंध विकसित करण्याचे आवाहन केले आहे. काही वर्षांपूर्वी मी भारतात मिनी जपान करण्याविषयी बोललो होतो. आज माझ्यासाठी आनंदाची बाब आहे कि, तुम्ही मोठया संख्येने भारतात काम करत आहात असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी म्हणाले. सध्या जपान दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी राजधानी टोक्योमध्ये मेक इन इंडिया संदर्भातील एका कार्यक्रमाला संबोधित करत आहेत. त्यांच्यासोबत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही आहेत.
२०१४ मी सरकारची जबाबदारी स्वीकारली तेव्हा वर्ल्ड बँकेच्या व्यवसाय सुलभतेच्या क्रमवारीत भारत १४० व्या स्थानी होता. आता याच यादीत भारत १०० व्या स्थानी पोहोचला आहे. व्यवसाय सुलभतेच्या क्रमवारीत आणखी चांगले स्थान मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे मोदी म्हणाले.
भारत सध्या अनेक मोठ्या बदलांना सामोरा जातो आहे. सध्या गुंतवणूक करायची असेल तर भारत हा एक उत्तम देश आहे. जपानमध्ये राहणाऱ्या भारतीय माणसांनी प्रगती करावी आणि भारताच्या प्रगतीलाही हातभार लावावा. वैश्विक शांततेत भारताची भूमिका महत्त्वाची आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान मध्ये राहणाऱ्या भारतीय लोकांच्या समुहाशी संवाद साधताना म्हणाले.
सध्याच्या घडीला भारत ही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. बुलेट ट्रेन-स्मार्ट सिटी, न्यू इंडिया ही भारताच्या विकासाची पावलं आहेत. न्यू इंडिया अर्थात नवभारत घडवायचा असेल तर मला तुम्हा सगळ्यांचं सहकार्य हवं आहे असंही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान येथील बांधवांना केलं. एवढंच नाही तर जगातली सर्वात मोठी शिल्पकृती अर्थात स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा पाहण्यासाठी तुम्ही जरूर भारतात या असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.