breaking-newsराष्ट्रिय

विश्वासदर्शक ठरावाकडे लक्ष!

कर्नाटकमधील नाटय़ संपेना; सत्ताधाऱ्यांकडून बंडखोरांची मनधरणी

कर्नाटकातील काँग्रेस-जनता दल धर्मनिरपेक्ष यांचे आघाडी सरकार अल्पमतात आले असून मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी राजीनामा द्यावा किंवा सोमवारी विश्वासदर्शक ठराव घ्यावा, अशी मागणी भाजपने रविवारी केली आहे. दरम्यान नाराज आमदारांच्या मनधरणीचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरूच आहेत. काँग्रेस आमदार नागराज यांच्या मनधरणीचा प्रयत्न फसला आहे.

सत्ताधारी आघाडीतील १६ आमदारांनी विधानसभेचा राजीनामा दिला आहे त्यात काँग्रेसचे १३ व जनता दल धर्मनिरपेक्ष यांचे तीन आमदार आहेत. अपक्ष आमदार एच नागेश व आर. शंकर यांनी आघाडी सरकारचा पाठिंबा मागे घेऊन भाजपला पाठिंबा दिला आहे. आता भाजपचे संख्याबळ १०७ असून १६ आमदारांचे राजीनामे स्वीकारले तर सत्ताधारी आघाडीचे संख्याबळ येणार आहे.

सरकारकडे बहुमत नाही त्यामुळे राजीनाम द्या किंवा सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडावा अशी सूचना भाजप प्रदेशाध्यक्ष बी.एस. येडियुरप्पा यांनी केली. आपण स्वेच्छेने विश्वासदर्शक ठराव मांडणार आहोत, असे कुमारस्वामी यांनी विधानसभेत स्पष्ट केले होते. बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यामुळे निर्माण झालेला गोंधळ संपवण्यासाठी तोच मार्ग आहे. शुक्रवारी कुमारस्वामी यांनी कामकाज समिती बैठकीत विश्वासदर्शक ठराव बुधवारी मांडण्याचे जाहीर केले होते. पण त्या वेळी भाजपचे प्रतिनिधी उपस्थित नसल्याने अंतिम निर्णय झाला नव्हता.

दरम्यान, पाच बंडखोर काँग्रेस आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार हे राजीनामे स्वीकारत नसल्याची तक्रार केली आहे. आनंद सिंग, के.सुधाकर, एन नागराज, मुनीरत्ना, रोशन बेग यांच्यासह दहा बंडखोरांचे राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे असून त्यावरची याचिका सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणीला येणार आहे.

नाराज आमदार पुन्हा मुंबईत : बंडखोर काँग्रेस आमदार टी. बी. नागराज यांची समजूत काढण्याचे  कर्नाटकातील सत्ताधारी आघाडीचे प्रयत्न फसले असून नागराज हे रविवारी पुन्हा मुंबईला रवाना झाले आहेत.  काँग्रेस- जनता दल धर्मनिरपेक्ष यांच्या आघाडीने नागराज यांच्याशी शनिवारी चर्चा केली व त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. होस्कोटचे आमदार असलेले आमदार नागराज यांनी सांगितले की, चिकबल्लारपूरचे आमदार सुधाकर यांच्याशी चर्चा केल्याशिवाय आपण राजीनामा मागे घेण्याबाबत अंतिम निर्णय घेणार नाही. १० जानेवारीला सुधाकर व नागराज यांनी एकाच वेळी राजीनामा दिला होता. नागराज हे राजीनामा देण्यापूर्वी कुमारस्वामी मंत्रिमंडळात गृहनिर्माण मंत्री होते. अजूनही आपण काँग्रेस पक्षात आहोत असे त्यांचे म्हणणे आहे.

रेड्डी यांची मनधरणी : कर्नाटकातील राजकीय पेच संपण्याची चिन्हे नसून बंडखोर आमदार रामलिंग रेड्डी यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी काँग्रेसने रविवारी प्रयत्न केले. काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष ईश्वर खांडरे व एच.के.पाटील हे रामलिंग रेड्डी यांच्या निवासस्थानी गेले आहेत. मनधरणीच्या प्रयत्नांना त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. राजीनामा दिलेल्या आमदारात त्यांचा समावेश असून शनिवारी भाजपचे आमदार एस. आर. विश्वनाथ व पद्मनाभ रेड्डी यांनी त्यांची निवासस्थानी भेट घेतली. रामलिंग रेड्डी हे मुंबईला गेलेले नाहीत. त्यांनी पक्षविरोधी कारवायात मोडेल असे कुठले निवेदन केलेले नाही त्यामुळे ते पक्ष सोडणार नाहीत, असे काँग्रेस प्रवक्ते सुभाष अग्रवाल यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button