‘वायू’ वादळ कच्छच्या दिशेने
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/cyclone-vayu-new-1.jpg)
जोरदार पावसाची शक्यता; जिल्हा प्रशासनाला सतर्कतेचा इशारा
वायू नावाचे वादळ सोमवारी रात्री कमी दाबाचा पट्टा बनून गुजरातचा किनारा ओलांडून जात आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. कच्छ जिल्हा प्रशासन सतर्क असून या भागात वादळामुळे जोरदार पावसाची शक्यता आहे.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पाच पथके व स्थानिक अधिकाऱ्यांनी मदत कार्याची तयारी केली असून जेव्हा गरज भासेल तेव्हा ते मदतीसाठी सज्ज आहेत असे सांगण्यात आले. ईशान्य अरबी समुद्रातील हे वादळ ओमानकडे जाणार होते पण तसे झाले नाही. ते गेल्या सहा तासांत ताशी १३ कि.मी वेगाने ईशान्येकडे वाटचाल करीत आहे, असे भारतीय हवामान खात्याने स्पष्ट केले.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार वादळामुळे समुद्र खवळलेला राहील त्यामुळे मच्छिमारांनी सागरात मासेमारीसाठी जाऊ नये. कच्छच्या जिल्हाधिकारी रेम्या मोहन यांनी सांगितले की, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पाच पथके कच्छमध्ये तैनात करण्यात आली आहेत. मीठागरात काम करणाऱ्या व्यक्तींना सागरात जाऊ नये असे सांगण्यात आले आहे.
वादळ हे गुजरातमध्ये १३ जूनला भूस्पर्श करील असे सांगण्यात आले होते पण नंतर ते गुजरातपासून दूर जाऊ लागले. त्यामुळे गुजरात किनारपट्टीला असलेला धोका टळला होता. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी असे सांगितले की, हे वादळ पुन्हा गुजरातमधील कच्छकडे वळले असले तरी त्याचे कमी दाबाच्या पट्टय़ात रूपांतर होत आहे.
वादळ गुजरातचा किनारा ओलांडणार
सोमवारी सकाळी वादळ नलियापासून पश्चिम-नैर्ऋत्येला २६० कि.मी अंतरावर, द्वारकेपासून पश्चिम-नैर्ऋत्येला २४० कि.मी अंतरावर तर गुजरातमधील भूजपासून पश्चिम-नैर्ऋत्येला ३४० कि.मी अंतरावर होते. पुढील सहा तासांत त्याचे कमी दाबाच्या पट्टय़ात रुपांतर होणार आहे. ते आता ईशान्येकडे जाण्याची शक्यता असून १७ जून रोजी रात्री कमी दाबाच्या पट्टय़ाच्या रुपात गुजरातचा किनारा ओलांडून जाईल.