वादळी पावसाने मरण पावलेल्यांची संख्या 53
नवी दिल्ली – देशातील चार राज्यात काल सायंकाळी अचानक उद्भवलेल्या वादळ व पावसाच्या माऱ्यात मरण पावलेल्यांची संख्या आता 53 झाली आहे. त्यातील 39 जण उत्तरप्रदेशातील आहेत. नऊ जण आंध्रातील, चार जण पश्चिमबंगाल मधील आणि दिल्लीतील एका मृताचा त्यात समावेश आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आज देण्यात आली.
या वादळीपावसात अनेक ठिकाणी मोठी पडझड झाली आहे. त्यात विजेचे खांब कोसळण्याबरोबरच घरे आणि झाडे पडण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्या पडझडीत जखमी झालेल्यांची संख्याही मोठी असून उत्तरप्रदेशातील एकूण 53 जण यात जखमी झाले असून दिल्लीतील अकरा जणही जखमी झाले आहेत.
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाना, मध्यप्रदेश, झारखंड, आसाम, मेघालय, कर्नाटक, केरळ, तामिळनाडु या राज्यांतही अनेक ठिकाणी काल वादळी पाऊस व काहीं ठिकाणी गारपीटही झाल्याच्या बातम्या आहेत. तथापी या राज्यांमध्ये जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.