वडीलोपार्जित संपत्तीमध्ये मुलीचा हक्क अबाधित: न्यायमुर्ती उदय ललीत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/women-3.jpg)
कोल्हापूर– वडीलोपार्जित संपत्तीमध्ये हिंदु मुलीचा कायदेशीर हक्क समान आणि अबाधित आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती उदय ललीत यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा बार असोसएशनच्या संयुक्त विद्यमाने शाहु स्मारक भवन येथे आयोजित केलेल्या ऍड. अरविंद शहा स्मृति व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना न्यायमुर्ती उदय ललीत बोलत होते. या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती जे. ए. पाटील, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश म. आ. लव्हेकर उपस्थित होते.
“हिंदु महिलेची सहहिस्सेदार म्हणून वडीलोपार्जित संपत्तीत असणारा हक्क व त्याची सध्याची कायदेशीर परिस्थिती’ या विषयावर न्यायमुर्ती उदय ललीत म्हणाले, हिंदु वडिलोपार्जित संपत्तीमध्ये कर्ता कोण? महिला कर्ता होऊ शकते का ? सध्या कुटुंबातील मोठी मुलगी समान सहहिस्सेदार असल्याने तिला मुलाइतकाच समान हक्क आहे. हिंदु स्त्री सुध्दा मग कर्ता का होऊ शकत नाही ? दिल्ली उच्च न्यायालयाने एका न्याय निर्णयात स्पष्ट केले की, मोठी मुलगी ही सुध्दा हिंदु कुटुंबाची कर्ता होऊ शकते. आपण “बेटी बचाओ-बेटी पढाओ’चा नारा देतो, अशा वेळी आपल्या मुली खुप महत्वाच्या आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेऊ नका, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ऍड. अरविंद शहा यांच्या आठवणींना उजाळा दिला.