लोकशाही कार्यकर्त्यांवरील निष्ठुर कारवाईस ३० वर्षे पूर्ण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/Untitled-9-7.jpg)
तिआनान मेन चौकात कडक बंदोबस्त
तिआनान मेन चौकात ४ जून १९८९ रोजी लोकशाहीवाद्यांच्या निदर्शनांवर करण्यात आलेल्या निष्ठुर कारवाईत एक हजाराहून अधिक लोक मारले गेल्याच्या घटनेला मंगळवारी तीस वर्षे पूर्ण झाली, त्या निमित्त या चौकात कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती. तेथील मूक शांतता आसमंत भेदून जात होती. पोलिसांनी पर्यटक व इतरांची ओळखपत्रे उपमार्गाच्या ठिकाणी तपासली. परदेशी पत्रकारांना तिआनान मेन चौकात जाण्यास मज्जाव करण्यात आला होता, छायाचित्रे घेण्यासही बंदी घालण्यात आली होती.
दरम्यान तीस वर्षांपूर्वी झालेल्या या निदर्शनांच्या चळवळीचे अमेरिकेने कौतुक केले असून चीनच्या दडपशाहीविरोधातील ती चळवळ होती असे म्हटले आहे. चीनने या आंदोलनाच्या स्मृती दिनापूर्वी अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली. थेट प्रक्षेपण करणारी अनेक संकेतस्थळे तांत्रिक कारणे दाखवून बंद ठेवण्यात आली. गेली अनेक वर्षे तिआनान मेन चौकातील घटनेबाबत चर्चेवर चीनने अघोषित र्निबध घातले होते. या आंदोलनात हजाराहून अधिक लोकशाहीवादी आंदोलकांना सैनिकांनी गोळ्या घातल्या होत्या. २०१२ मध्ये क्षी जिनपिंग यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर नागरी समुदायाची गळचेपी केली होती. या काळात कामगार चळवळीशी सहानुभूती दाखवणाऱ्या मार्क्सवादी विद्यार्थ्यांसह, वकील, हक्क कार्यकर्ते यांना तुरुंगात टाकण्यात आले.
दरम्यान मंगळवारी तिआनान मेन चौकातील खांबांवर असंख्य टेहळणी कॅमेरे लावण्यात आले होते. या वेळी एका ‘दीदी राइड’ सेवेच्या एका चालकाने सांगितले, की आम्हाला या सगळ्याचे सोयरेसुतक नाही अशातला भाग नाही. तेव्हा काय झाले होते हे आम्हाला माहिती आहे. पण आपले हे संभाषण दीदीअॅपवर नोंदले जात आहे त्यामुळे मी काही बोलू शकत नाही. आज चीन बदलला आहे. तुमच्याजवळ पैसा असेल, तर सर्व काही आहे पण पैशाशिवाय तुम्ही तोंड उघडू शकत नाही. तिआनान मेन चौकात मंगळवारी सर्व व्यवहार सुरळीत चालू होते. काही मुले पालकांच्या खांद्यावर बसून देशाचे लहान आकारातील ध्वज फडकावत होते. तेथील रोजच्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी ते पहाटेपासूनच जमले होते. कडक सुरक्षेमुळे रांग हळूहळू पुढे सरकत होती.
४ जून १९८९ रोजी काय घडले?
१९८९ च्या उन्हाळ्यात विद्यार्थी व कामगार तिआनान मेन चौकात जमले होते. तिआनान मेन चौक हा चीनमधील सत्ताशक्तीचे प्रतीक आहे. या निदर्शकांनी देशात लोकशाही बदल करून भ्रष्टाचार संपवण्याची मागणी केली व त्यासाठी त्यांची निदर्शने सुरू होती. सात आठवडे हे आंदोलन सुरू होते, अखेर ४ जून १९८९ रोजी चीन सरकारने तेथे रणगाडे चालवून लोकशाही आंदोलनकर्त्यांना गोळ्या घातल्या, काहींना रणगाडय़ाखाली चिरडण्यात आले. त्यात निदर्शक व काही आजूबाजूचे लोक मारले गेले होते, त्यांची संख्या हजारहून अधिक होती.