राजधानी दिल्लीत पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी
नवी दिल्ली – राजधानी दिल्लीसह नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्राम या परिसरात आज सकाळी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी नोएडा, गाजियाबाद, गुरुग्राम आणि दिल्लीच्या सखल भागातील रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यामुळे तेथे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, उद्याही दिल्लीत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
आज सकाळी दिल्लीच्या आकाशात ढग जमा झाले. त्यानंतर काही वेळातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शहराच्या सखल भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले. यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होऊन अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार या महिन्यात आतापर्यंत दिल्लीत १३९.२ मिमी एवढा पाऊस झाला असून तो सर्वसामान्य १५७.१ मिमी पावसापेक्षा कमी आहे. जूनपासून आतापर्यंत दिल्लीत एकंदर ४५७.८ मिमी एवढा पाऊस पडला आहे.