रशियात डॉक्टर, शिक्षकांना मिळणार कोरोनाच्या लसीचा पहिला डोस
मॉस्को – रशियाने कोरोना व्हायरसविरोधात विकसित केलेली लस पहिल्या फेजमध्ये यशस्वी ठरली होती. रशियाने येत्या ऑक्टोबर महिन्यापासून सर्वसामान्यांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. याच महिन्यात १० ऑक्टोबरपर्यंत लसीची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर प्राधान्यक्रम ठरवताना डॉक्टर आणि शिक्षकांना या लसीचा पहिला डोस देण्यात येईल, अशी माहिती रशियाच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली.
गेमली इंस्टिट्यूट ऑफ अॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या या लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्या असून रजिस्ट्रेशनसाठी पेपरवर्क सुरू आहे असे रशियाचे आरोग्य मंत्री मिखाईल मुराश्कोव यांनी सांगितले.
‘लसीच्या सर्व क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्या आहेत’, असे मुराश्कोव पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आठवड्याभरात लसीकरण सुरू होईल. नियमानुसार या लसीच्या चाचण्या झाल्या असून कुठेही संशोधनाचा कालावधी कमी केलेला नाही, असे रशियन संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. गेमली इंस्टिट्यूट ऑफ अॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या या लसीच्या क्लिनिकल चाचण्या सेचेनोव्ह विद्यापीठाने १८ जून रोजीच सुरू केल्या होत्या.