रजनी पाटील यांची हिमाचल प्रदेशच्या प्रभारी म्हणून नियुक्ती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/rajani-patil-.jpg)
नवी दिल्ली : राज्यसभेच्या माजी खासदार रजनी पाटील यांची काँग्रेसने हिमाचल प्रदेशच्या प्रभारी म्हणून मंगळवारी नियुक्ती केली. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची जागा त्या घेतील. याशिवाय बिहार आणि गुजरातसाठी दोन-दोन सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सुशीलकुमार शिंदे हेही महाराष्ट्रातीलच आहेत आणि पूर्वी त्यांनी संघटनेत महत्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. शिंदे आणि रजनी पाटील हे सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय समजले जातात. काँग्रेसचे महासचिव अशोक गेहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.
बिहारसाठी वीरेंद्र सिंह राठौर आणि राजेश लिलोठिया यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय जितेंद्र बघेल आणि विश्वरंजन मोहंती यांची गुजरातसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.राहुल गांधी यांनी पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी नदीम जावेद यांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी खुर्शीद अहमद सय्यद अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष होते. या सर्व नियुक्त्या तात्काळ प्रभावाने लागू असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे.