युरोपियन व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी भारताला अत्यावश्यक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/naseer-pak-1-1.jpg)
म्हणूनच भारताला पाकशी संबंध ठेवणे गरजेचे – जांजुआ
इस्लामाबाद – विकसनशील भारताला व्यापारासाठी युरोपियन मार्केटशी संपर्क ठेवणे आवश्यक आहे त्यासाठी त्यांना पाकिस्तानच्याच भूमिचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे पाकिस्तानशी संबंध ठेवणे भारतासाठी अत्यावश्यकच ठरले आहे असे प्रतिपादन पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासेर जांजूआ यांनी केले आहे.
कनेक्टीव्हीटी ऍन्ड जिओ इकॉनॉमिक्स ईन साऊथ एशिया या विषयावरील एका परिषदेत बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले आहे. ते म्हणाले की अर्थकारण आणि सुरक्षा हे दोन्हीं विषय एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे दक्षिण अशियात स्थैर्य कायम ठेवायचे असेल तर कनेक्टीव्हीटी चांगली असणे ही पुर्व अट आहे. कनेक्टीव्हीटी किंवा संपर्क असेल तरच आर्थिक विकास होईल आणि त्यानंतरच स्थैर्य प्राप्त करून घेता येऊ शकते. ते म्हणाले की भारत ही उभरती आर्थिक शक्ती आहे. आणि त्यांना त्यांच्या व्यापारासाठी युरोपशी व्यवहार करावा लागतो.
युरोपियन बाजारपेठेशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी त्यांना पाकिस्तानी हद्दीचाच वापर करणे अनिवार्य आहे. त्यामुळे त्यांना पाकिस्तानशी संबंध ठेवणे हे अपरिहार्य ठरले आहे असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले. त्याचवेळी चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर मध्ये भारताला सहभागी करून घेतल्याशिवाय या भागात मुक्त व्यापार व्यवस्था अस्त्विात येऊ शकत नाहीं हेहीं तितकेच खरे आहे.
दक्षिण अशियातील जिओ आर्थिक व्यवस्थेसाठी पाकिस्तान हा महत्वाचा दुवा आहे. हा देश अन्य देशांच्या आर्थिक संबंधांमध्ये कनेक्टीव्हीटीचे उत्तम साधन ठरू शकतो त्यामुळे या परिस्थितीत पाकिस्तानचे महत्व अबाधित राहणार आहे. पाकिस्तानला बरोबर घेतल्याशिवाय भारताला जगाच्या अन्य देशांशी व्यापार करता येणे अवघड आहे त्यामुळे मागील कडवटपणा विसरून आता दोन्ही देशांनी एकत्र येणे गरजेचे आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले.