यादव यांच्या शरीरवाचक टोमण्याची दखल घ्यावी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Untitled-11-10.jpg)
वसुंधरा राजे यांचे निवडणूक आयोगाला आवाहन
आपल्यावर जनता दल संयुक्तचे माजी नेते शरद यादव यांनी शरीरवाचक टीका करताना ‘ही जाडी बाई आता दमली आहे तेव्हा मतदारांनी तिला विश्रांतीसाठी घरी बसवावे’ असे वक्तव्य करून खालची पातळी गाठली आहे, याची निवडणूक आयोगाने दखल घ्यावी, असे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे यांनी म्हटले आहे.
यादव यांनी वसुंधरा राजे यांच्यावर व्यक्तिगत टीका केली असून, त्यांनी अल्वर येथे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी घेतलेल्या जाहीर सभेत असे म्हटले होते, की वसुंधरा राजे यांच्यासारखी जाडी बाई आता दमली असून तिला लोकांनी विश्रांती द्यावी.
वसुंधरा राजे यांनी झालवार येथे सांगितले, की शरद यादव यांनी माझा अपमान केला असून हा सगळय़ा महिलांचा अपमान आहे. त्यांचे वक्तव्य धक्कादायक असून, यादव यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तीने अशा खालच्या पातळीला जाऊन वक्तव्ये करणे अशोभनीय आहे. शरद यादव यांचे आमच्या कुटुंबाशी घनिष्ठ संबंध आहेत, पण त्यांनी त्यांच्या भाषेवर ताबा ठेवला नाही, त्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी निवडणूक आयोगाने त्यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. शरद यादव जे बोलले त्याची चित्रफीत समाज माध्यमावर आली असून, यादव यांच्या वक्तव्यावर लोकांनी टीकात्मक प्रतिसाद दिला आहे.
राजे या मध्य प्रदेशच्या कन्या आहेत. त्या आता दमल्या आहेत, त्यामुळे लोकांनी त्यांना विश्रांती देणे गरजेचे आहे. आधी त्या सडपातळ होत्या, पण आता जाड झाल्या आहेत, असे यादव यांनी म्हटल्याचे ध्वनिचित्रफितीतून स्पष्ट झाले आहे.