…म्हणून ‘त्या’ १६ वर्षीय मुलीची करण्यात आली हत्या
नवी दिल्ली : घरकामाचा पगार मागितला म्हणून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तीन तुकडे करण्यात आले. दिल्लीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी मनजीत कारकेताला अटक केली आहे.
दिल्लीतील एका नाल्यात चार मे रोजी मुलीच्या मृतदेहाचे तुकडे मिळाले होते. मनजीतने या मुलीला झारखंडहून आणल्यानंतर तिला दिल्लीत घरकामाला लावले होते. नाल्यामध्ये मुलीच्या मृतदेहाचे तुकडे सापडल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मियानवाली नगरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मुलीच्या हत्येनंतर मियानवाली नगरमध्ये राहणारा झारखंडमधला एका रहिवाशी बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी संशयिताच्या गावच्या घरावर धाड टाकली तेव्हा तो तिथे सापडला नाही. त्यानंतर १७ मे ला संशयित आरोपी दिल्लीतील त्याच्या घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून आरोपी मनजीत कारकेताला अटक केली. दरम्यान, चौकशीमध्ये मनजीतने झारखंडमधील गरीब मुलींना नोकरीचे आमिष दाखवून आपण दिल्लीला आणत असल्याची कबुली दिली.