मोदी-जिनपिंग यांचा मतभेद मिटविण्याचा निर्धार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/Untitled-34-1.jpg)
काश्मीर ते दहशतवाद, सीमा प्रश्न ते वाढती व्यापारी तूट या उभय देशांमधील आव्हानांचा उल्लेख शुभजित रॉय, एक्स्प्रेस वृत्तसेवा, महाबलीपूरम तमिळनाडूतील महाबलीपूरम या सातव्या शतकातील स्मारके असलेल्या तटवर्ती शहरात शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी दोन्ही देशांमध्ये असलेले अनेक मतभेद सोडविण्याचा त्याचप्रमाणे काश्मीर ते दहशतवाद आणि सीमा प्रश्न ते वाढती व्यापारी तूट या दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये बाधा आणणाऱ्या आव्हानांचा मुकाबला करण्याचा निर्धार केला.
मोदी यांनी या वेळी तमिळनाडूचा पारंपरिक वेश परिधान केला होता तर जिनपिंग पांढरा शर्ट आणि काळी पॅण्ट अशा औपचारिक पेहेरावात होते. पंत रथ या नयनरम्य परिसरात भर दुपारच्या उन्हात दोन्ही नेत्यांना नारळ-पाण्याचा आस्वाद घेत अल्पकाळ चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये अत्यंत संवेदनक्षम प्रश्नांवर चर्चा होणार असून ती दोन्ही देशांमधील संबंधांची चाचणी ठरणार आहे, कारण केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्याबद्दल चीनने टीकेचा सूर लावला आहे.
डोकलाम संघर्षांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची चीनमधील वुहान येथे भेट झाली होती त्याचप्रमाणे आता दोन्ही नेते दुसऱ्यांदा काश्मीर प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर एकमेकांशी चर्चा करणार आहेत. क्षी यांचे दुपारी दोन वाजता चेन्नईत आगमन झाले आणि ते भूमार्गाने महाबलीपूरम येथे गेले तर मोदी हेलिकॉप्टरने पोहोचले. दोन्ही नेत्यांची सायंकाळी पाच वाजता भेट झाली त्यानंतर मोदी जिनपिंग यांना युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा असलेल्या स्मारकांच्या ठिकाणी फेरफटका मारण्यास घेऊन गेले.
त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या शिष्टमंडळांचा एकमेकांना परिचय करून दिला. भारतीय शिष्टमंडळात अजित दोभाल (एनएसए), परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा समावेश होता तर चीनच्या शिष्टमंडळात चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी आणि स्टेट कौन्सिलर यांग जिएची यांचा समावेश होता. मोदी यांनी जिनपिंग यांच्या सन्मानार्थ रात्री स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला असून त्यापूर्वी दोन्ही नेत्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावली. स्नेहभोजनाला दोन्ही बाजूंकडून प्रत्येकी आठ सदस्य हजर राहणार आहेत.
आज संयुक्त नव्हे, तर स्वतंत्र निवेदने
शनिवारी मोदी आणि जिनपिंग ताज फिशरमन्स कोव्हच्या टँगो हॉलमध्ये भेटणार असून त्यांच्यात व्यापक चर्चा होणार आहे आणि त्यानंतर शिष्टमंडळाच्या स्तरावर चर्चा होणार आहे, या चर्चेनंतर दोन्ही बांजूनी स्वतंत्र निवेदने जारी केली जाणार आहेत, संयुक्त निवेदन जारी करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले.