मोदींनी समुद्रकिनाऱ्यावर गोळा केला प्लास्टिकचा कचरा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/modi-4.jpg)
तमिळनाडू:- तमिळनाडूतील महाबलीपूरम या सातव्या शतकातील स्मारके असलेल्या तटवर्ती शहरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग दोन दिवसांच्या अनौपचारिक परिषदेसाठी शुक्रवारी दुपारी दाखल झाले. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाबलीपूरम येथील समुद्र किनाऱ्यांवार फेरफटका मारत किनाऱ्याची साफसफाई केली. मोदींच्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून इतरांनाही सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ ठेवण्याची काळजी घेतली पाहिजे असं मोदींनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या महाबलीपूरम दौऱ्यावर आहेत. आज मोदी आणि जिनपिंग ताज फिशरमन्स कोव्हच्या टँगो हॉलमध्ये भेटणार असून त्यांच्यात व्यापक चर्चा होणार आहे. मात्र त्याआधी आज सकाळीच मोदी महाबलीपूरमच्या समुद्रकिनाऱ्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी समुद्रकिनाऱ्यावरील प्लास्टिकचा कचरा गोळा केला. जवळजवळ अर्धा तास मोदी अनवाणीच समुद्रकिनाऱ्यावर कचरा गोळा करत भटकत होते. त्यांनी तेथील प्लास्टिकचा कचरा गोळा केला. यामध्ये प्लास्टिकचे पाकिटं, बाटल्या, झाकणं आणि इतर गोष्टींचा समावेश होता. मोदींनी केलेल्या या साफसफाईचा तीन मिनिटांचा व्हिडिओ ट्विटवर पोस्ट करण्यात आला आहे. मोदींनी गोळा केलेला प्लास्टिकचा कचरा शेवटी ते ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत त्या हॉटेलचा कर्चमारी जयराज यांच्याकडे दिला. हा व्हिडिओ पोस्ट करताना मोदींनी ‘आपण सर्वांनीच सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. तसेच आपण सर्वांना तंदरुस्त रहाण्याचाही प्रयत्न करायला हवा,’ असं आवाहन नागरिकांना केलं आहे.
दरम्यान, शुक्रवारी मोदी आणि शी जिनपींग यांनी महाबलीपूरम येथील ऐतिहासिक मंदिरांमध्ये भटकंती केली. मोदींनी या वेळी तमिळनाडूचा पारंपरिक वेश परिधान केला होता तर जिनपिंग पांढरा शर्ट आणि काळी पॅण्ट अशा औपचारिक पेहेरावात होते. पंत रथ या नयनरम्य परिसरात भर दुपारच्या उन्हात दोन्ही नेत्यांना नारळ-पाण्याचा आस्वाद घेत अल्पकाळ चर्चा केली.