मोदींच्या परदेश दौऱ्यांसाठी दीड हजार कोटी खर्च
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/narendramodi-indonesia_2-1.jpg)
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांसाठी चार वर्षांत 1 हजार 484 कोटी रूपये इतका खर्च आला. मोदींनी जून 2014 ते 10 जून 2018 या कालावधीत 84 देशांना भेट दिली.
याबाबतची माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के.सिंह यांनी गुरूवारी राज्यसभेत दिली. मोदींच्या विमानावरील देखभालीसाठी 1 हजार 88 कोटी रूपये खर्च झाले. त्यांच्या चार्टर्ड उड्डाणांसाठी 387 कोटी रूपये खर्च आला. तर हॉटलाईनसाठी 9 कोटी 12 लाख रूपये खर्च झाले. मे 2014 मध्ये मोदींनी पंतप्रधानपदाची सुत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत 42 परदेश दौरे केले.
मोदींनी पंतप्रधान म्हणून सर्वप्रथम भूतानला जून 2014 मध्ये भेट दिली. त्यांनी 2015-16 मध्ये 24 देशांना, 2016-17 मध्ये 18 देशांना, 2017-18 मध्ये 19 देशांना आणि 2014-15 मध्ये 13 देशांना भेट दिली. मागील महिन्यात ते चीनसह 10 देशांचा दौरा करून आले. मोदींच्या दौऱ्यांमुळे भारताच्या परदेशी भागीदारांबरोबरच्या संबंधांमध्ये वाढ झाल्याचेही सिंह यांनी नमूद केले.