मुशर्रफ यांनी दिला पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/musharraf.jpg)
इस्लामाबाद -पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग (एपीएमएल) या पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याचे मनसुबे उधळले गेल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलले. पाकिस्तानात 25 जुलैला सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीसाठी 74 वर्षीय मुशर्रफ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, पाकिस्तानच्या निवडणूूक आयोगाने तो फेटाळला. त्यानंतर मुशर्रफ यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता डॉ.अमजद शोएब यांची एपीएमएलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, दुबईत वास्तव्यास असलेल्या मुशर्रफ यांनी एक व्हिडीओ संदेश जारी करून त्यांची भूमिका मांडली. मायदेशी परतून निवडणूक लढवण्याची माझी इच्छा होती. मात्र, सरकारला माझ्या मागण्या पूर्ण करण्यात अपयश आल्याने आता मी तसे करू शकत नाही. मला तहहयात अपात्र ठरवण्यात आले आहे. तो निर्णय मागे घ्यावा अशी माझी मागणी होती. परदेशात जाण्यास मनाई असणाऱ्यांच्या यादीतूून नाव वगळण्याची मागणीही मी केली होती. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना देशात आणि परदेशात फिरण्याची मोकळीक असेल तर मला का नाही, असा सवालही त्यांनी केला. पाकिस्तानात परतल्यावर अटक केली जाऊ नये, अशीही त्यांची मागणी होती. विविध आरोपांवरून मुशर्रफ यांच्याविरोधात खटले दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.