मुलींना अश्लील चित्रपट दाखवत होता मुख्याध्यापक, गुन्हा दाखल
शाळांना ज्ञान मंदिर म्हटले जाते. चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी लोक आपल्या मुलांना शाळेत दाखल करतात. मात्र मध्य प्रदेशमधील एका शाळेत एक असा विचित्र प्रकार घडला आहे की, लोक शाळांकडेही संशयाने पाहतील. मध्य प्रदेशमधील सिहोर येथील एका प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाने विद्यार्थिनींना मोबाइलवर पॉर्न चित्रपट दाखवले. पोलिसांनी याप्रकरणी मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल केला आहे. संशयित मुख्याध्यापक पसार झाला आहे.
सिहोर जिल्ह्यातील गोपालपूर ठाण्याच्या प्रभारी उमा मरावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडागावच्या प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक रामभरोसे शाळेतील विद्यार्थिनींना अश्लील चित्रपट दाखवत होता. शाळेतील विद्यार्थिनींनी आपल्या पालकांना मुख्याध्यापकाचे हे कृत्य सांगितले. त्यानंतर पालकांनी मुख्याध्यापकाला जाब विचारला असता त्याने माफी मागून विषय संपवण्याचा प्रयत्न केला.
मुख्याध्यापकाने माफी मागितल्यामुळे पालकांनी त्याला माफ ही केले. परंतु, काही दिवसांनी त्या मुख्याध्यापकाने पुन्हा हे कृत्य सुरु केले. मुले वारंवार तक्रार करत असल्यामुळे अखेर पालकांनी पोलिसांत त्या मुख्याध्यापकाची तक्रार दाखल केलील. गुन्हा दाखल होताच मुख्याध्यापक पसार झाला. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. लवकरच तो ताब्यात येईल असा विश्वास मरावी यांनी व्यक्त केला आहे.