breaking-newsराष्ट्रिय

मित्रपक्षांची इच्छा असल्यास पंतप्रधान बनेलही : राहुल गांधी

नवी दिल्ली – मित्रपक्षांची इच्छा असेल तर पंतप्रधान बनेलही, अशी स्पष्टोक्ती कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली. अर्थात, विरोधी पक्षांनी प्रथम एकत्र येऊन सत्तारूढ भाजपचा पराभव करण्याची गरज असल्याच्या वास्तवावरही त्यांनी बोट ठेवले.

एचटी लीडरशिप समिटदरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्‍नांना उत्तरे देताना राहुल यांनी विविध मुद्‌द्‌यांवर भूमिका मांडली. पंतप्रधान बनण्याच्या शक्‍यतेबाबत विचारल्यावर त्यांनी ती बाब मित्रपक्षांच्या इच्छेवर अवलंबून असल्याचे नमूद केले. अर्थात, पंतप्रधान कोण बनणार ही दोन टप्प्यांची प्रक्रिया आहे. मित्रपक्षांशी आमची चर्चा झाली. त्यात पंतप्रधानपदाबाबतची प्रक्रिया दोन टप्प्यांची असल्याचे आम्ही निश्‍चित केले. प्रथम एकत्र येऊन भाजपचा पराभव करणे याला प्राधान्य आहे. त्यानंतर निवडणूक झाल्यावर काय करायचे ते ठरवता येईल, असे त्यांनी म्हटले.

मागील काही काळापासून राहुल यांच्या मंदिर भेटींचा विषय गाजत आहे. मात्र, मी अनेक वर्षांपासून मंदिरे, गुरूद्वारा आणि मशिदींना भेटी देतो. पण, माझ्या मंदिर भेटींना अचानकपणे प्रसिद्धी मिळू लागली. भाजपला ते रूचत नसल्याचे मला वाटते. ती बाब त्या पक्षाला क्रोधित करते. केवळ आम्हीच मंदिरांमध्ये जाऊ शकतो असे त्या पक्षाला वाटत असावे, असा शाब्दिक टोला त्यांनी लगावला. टीका पचवण्याची कला मी शिकलो आहे. टीकेमुळे मी विचलित होत नाही. टीका सहन करायला आणि प्रश्‍न स्वीकारायला मी तयार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसे का करू शकत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. यूपीएच्या अध्यक्षा असणाऱ्या आई सोनिया गांधी यांच्या आणि तुमच्या नेतृत्वशैलीत काय फरक आहे, असा प्रश्‍न राहुल यांना विचारण्यात आला. त्यावर ते उत्तरले, मी आईकडून खूप काही शिकलो. तिने संयमी बनण्याचा धडा मला दिला. मी आता आईप्रमाणे अधिक ऐकून घेतो.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button