‘महाग झालाय तर कांदा कमी खा’; भाजपा मंत्र्याचा सल्ला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/09/Onion-1.jpg)
देशभरामध्ये कांद्याचे दर वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. उत्तर भारतामध्ये कांद्याचा विषय चांगलाच तापला आहे. त्यातच आता उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील आरोग्य मंत्र्यांनी ‘कांदा महाग झाला आहे तर कमी कांदा खा,’ असा अजब सल्ला सामान्यांना दिला आहे. एका पत्रकाराने त्यांना कांद्याच्या दरासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी हा सल्ला दिला.
उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री अतुल गर्ग हे रविवारी हरदोई येथील एका रुग्णालयाची पहाणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या चर्चेदरम्यान एका पत्रकाराने गर्ग यांना, कांद्याचे दर वाढत असून यासंदर्भात तुमचे काय म्हणणे आहे असा सवाल केला. गर्ग यांनी आधी पावसाचा शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम होतो असे सांगितले. ‘जास्त पाऊस पडल्यास शेतमाल खराब होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच शेतमालाचे दर वाढतात किंवा कमी होतात. जेवणाला चव येण्यासाठी वापरण्यात येणारा कांदा हा जास्तीत जास्त ५० ते १०० ग्राम इतका खायला हवा असं मला वाटतं. त्यामुळे मी लोकांना कमी कांदा खा असाच सल्ला देईन,’ असं मत गर्ग यांनी नोंदवले.