ममता बॅनर्जींच्या वक्तव्यावर ओवेसींचा ‘हा’ पलटवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/owasi-and-mamta-new.jpg)
तृणमुल काँग्रेसच्या नेत्या व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लमीन (एआयएमआयएम) पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यात कट्टरतावादावरून आता शाब्दिक वाद सुरू झाल्याचे दिसत आहे. ओवेसी यांचे नाव न घेता ममता बॅनर्जी यांनी हैदराबादमधील एक पार्टी आहे, जी भाजपाकडून पैसे घेते, असा गंभीर आरोप कूचबिहार येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना केला होता. त्यानंतर आता ओवेसी यांनी देखील ममता बॅनर्जी यांच्यावर पलटवार केला आहे. अशाप्रकारच्या वक्तव्यांद्वारे ममता बॅनर्जी त्यांच्या भीती आणि नैराश्याचे प्रदर्शन करत आहेत, असं ओवेसी म्हणाले आहेत.
”माझ्यावर आरोप करून तुम्ही बंगालच्या मुस्लिमांना हा संदेश देत आहात की, ओवेसीचा पक्ष राज्यात एक फार मोठी शक्ती बनला आहे. अशाप्रकारच्या वक्तव्यांद्वारे ममता बॅनर्जी त्यांच्या भीती आणि नैराश्याचे प्रदर्शन करत आहेत.” असे ओवेसी यांनी ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर बोलताना म्हटले आहे.
याचबरोबर ओवेसी यांनी, भाजपाने पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ पैकी १८ जागा कशा जिंकल्या? असा प्रश्न देखील ममता बॅनर्जी यांना केला आहे. शिवाय, पश्चिम बंगालमधील मुस्लीमांना मुलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगत, यावर प्रश्न विचारणे म्हणजे धार्मिक कट्टरता नाही, असे देखील म्हटले आहे.