भ्रष्टाचारी अधिकाऱ्याकडून जमीन परत मिळवण्यासाठी शेतकऱ्यावर भीक मागण्याची वेळ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Andhra-Farmer.jpg)
आंध्र प्रदेशातील एक शेतकरी आपल्या कुटुंबासोबत रस्त्यांवर भीक मागत फिरत आहे. नातेवाईकांनी बळकावलेली आपली जमीन मिळवण्यासाठी शेतकरी भीक मागत आहे. शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक महसूल अधिकाऱ्याकडे आपल्या जमिनीच्या मालकीची कागदपत्रं असून, त्याला लाच देण्यासाठीच आपण भीक मागण्याचा मार्ग निवडला आहे. भ्रष्टाचाराचा पर्दाफाश कऱण्यासाठी आणि निषेध नोंदवण्यासाठीच आपण भीक मागायचं ठरवलं असंही त्यांनी सांगितलं आहे.
मनयम वेंकटेसवरुलू उर्फ राजू असं या शेतकऱ्याचं नाव आहे. राजू कुरनूल जिल्ह्याचे रहिवासी आहेत. गळ्यात बॅनर घालून आणि हातात वाडगा घेऊन राजू आपल्या पत्नी आणि दोन मुलांसोबत लोकांना पैसे देण्याची विनंती करत आहे, जेणेकरुन स्थानिक अधिकाऱ्याला लाच देण्यासाठी पैसे जमा होतील.
‘कृपया आम्हाला पैसे द्या जेणेकरुन आम्ही लाच देऊ शकू. जर तुम्ही पैसे दिलेत तर तुमचं काम होईल. मी करु शकत नाही म्हणून हात गमावला आहे. गेल्या दोन वर्षात मी खूप संघर्ष केला आहे’, असं राजू लोकांना सांगत होते.
तेलुगू भाषेत असणाऱ्या या बॅनरवर महसूल अधिकाऱ्याला लाच देण्यासाठी पैसे नसल्याचं लिहिण्यात आलं आहे. जमीन परत मिळवण्यासाठी कुटुंब उपोषण करत असून, लाच देण्यासाठी पैसे जमा करण्यासाठी मदत करा असंही त्यावर लिहिलं आहे. आपल्या या आंदोलनाने अधिकारी नाराज असून आपल्या जीवाला धोका असल्याची भीती कुटुंबाने व्यक्त केली आहे.
राजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील माधवराम येथे त्यांची 25 एकर जमीन होती, जी नातेवाईकांनी बळकावली आहे. यासाठी त्यांनी महसूल अधिकाऱ्याला लाच दिली. यामुळे नाराज झालेल्या राजू यांनी आपणही जमीन मिळवण्यासाठी अधिकाऱ्याला लाच देणार असल्याचं सांगत भीक मागत पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र सर्व आरोप चुकीचे असून हा कौटुंबिक वाद असल्याचं म्हटलं आहे.