भारत अमेरिकेच्या दबावाखाली पण आमचा सच्चा मित्र – इराण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/ruhani-modi.jpg)
तेल आयातीच्या मुद्दावर भारत आपल्या राष्ट्रीय हिताचा विचार करेल असा विश्वास इराणने मंगळवारी व्यक्त केला. अमेरिकी निर्बंधांचा सामना करणाऱ्या इराणने भारताच्या ऊर्जा विषयक गरजांची काळजी घेण्याचे आश्वासन दिले आहे. परवडणाऱ्या दरांबरोबरच भारताचे आम्ही ऊर्जा संरक्षक बनायला तयार आहोत असे इराणचे भारतातील राजदूत अली चेगेनी यांनी म्हटले आहे.
अमेरिकी निर्बंधांना प्रभावहीन करण्यासाठी भारत आणि अन्य देशांबरोबर तेलाच्या व्यापारात वस्तु विनिमय, रुपये आणि युरोपियन तंत्राचा वापर करण्याची शक्यता अली चेगेनी यांनी व्यक्त केली. अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होत आहे. अमेरिकी निर्बंधांमुळे भारताने इराणकडून तेल आयात थांबवली आहे.
भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो यांनी भारताला तेलाची कमतरता भासू देणार नाही त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यापार्श्वभूमीवर इराणच्या राजदूतांनी व्यक्त केलेले हे मत महत्वपूर्ण आहे. माइक पॉम्पियो यांच्या बरोबरच्या भेटीतील एस. जयशंकर यांच्या विधानाचा दाखला देऊन चेगेनी म्हणाले की, जयशंकर तेलाची किंमत, उपलब्धता आणि सुरक्षेविषयी बोलत असतील तर इराण भारताच्या या सर्व अपेक्षा पूर्ण करु शकतो.
भारताने तेल आयात थांबवली असली तरी कोणतेही नकारात्मक संकेत दिलेले नाहीत असे चेगेनी यांनी सांगितले. भारत आमचा कायमस्वरुपी मित्र असून आपल्या राष्ट्रीय हितानुसार भारत कृती करेल. भारत दबावाखाली असला तरी तो इराणचा मित्र आहे असे अली चेगेनी म्हणाले. भारताच्या दुसऱ्या देशांबरोबरच्या संबंधांमुळे आमचे संबंध बिघडणार नाही असे त्यांनी सांगितले.