भारतासाठी धोक्याची घंटा! कर्तारपूर गुरुद्वारा असलेल्या भागात दहशतवादी तळ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/kartarpur-corridor.jpg)
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नरोवाल जिल्ह्यात दहशतवाद्यांचे प्रशिक्षण सुरु असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. याच जिल्ह्यामध्ये कर्तारपूर साहिब गुरुद्वारा आहे. कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटनला काही दिवस उरलेले असताना गुप्तचर यंत्रणांना ही माहिती मिळाली आहे. कर्तारपूर मार्गिका ही भारतातील पंजाबमध्ये असलेले डेरा बाबा नानक हे धार्मिक ठिकाण व पाकिस्तानातील कर्तारपूरचे दरबार साहिब यांना जोडणार आहे. हे ठिकाण आंतरराष्ट्रीय सीमेपासून चार कि.मी दूर आहे.
गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नरोवाल, मुरीदके आणि शाकारगर येथील दहशतवादी तळांवर पुरुष आणि महिलांचे प्रशिक्षण सुरु आहे. पंजाब सीमेसंदर्भातील सुरक्षा यंत्रणांच्या उच्चस्तरीय बैठकीतून ही माहिती समोर आली आहे. कर्तारपूर कॉरिडॉर सुरु झाल्यानंतर पाकिस्तानातील विविध गटांना भारतविरोधी कारवाया करण्यासाठी या कॉरिडॉरचा वापर करु न देणे हे सुरक्षा यंत्रणांसमोर मुख्य आव्हान आहे. कर्तारपूर कॉरिडॉर सुरु करण्यासाठी पाकिस्तानने जी तत्परता दाखवलीय त्यामागे खलिस्तान चळवळीला प्रोत्साहन देण्याचाही त्यांचा हेतू असू शकतो.
दरम्यान गुरूनानक यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त शीख बांधवांच्या स्वागतासाठी कर्तारपूर सज्ज असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. कर्तारपूर मार्गिकेचे ९ नोव्हेंबर रोजी औपचारिक उद्घाटन होणार असून त्यावेळी इम्रान खान उपस्थित राहणार आहेत. या मार्गिकेच्या माध्यमातून पाकिस्तानला मोठय़ा प्रमाणात पैसा मिळणार आहे. २०१९ हे शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक देव यांच्या ५५० व्या जयंतीचे वर्ष असून पाकिस्तानातील श्री नानकाना साहिब येथे त्यांचा जन्म झाला होता. कर्तारपूर शीख बांधवांच्या स्वागतास सज्ज आहे असे इम्रान यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विट संदेशात त्यांच्या सरकारने मार्गिका व इतर बांधकामे वेळेत पूर्ण केल्याबाबत अभिनंदन केले आहे. कर्तारपूर मार्गिका विक्रमी काळात बांधून तयार करणे हे सोपे काम नव्हते पण ते आमच्या सरकारने वेळेत पूर्ण केले असे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्ताननेही धार्मिक पर्यटनाला उत्तेजन देण्याचे ठरवल्याचे यातून दिसून येत आहे. तत्पूर्वी इम्रान खान यांनी कर्तारपूर भेटीसाठी शीख भाविकांना पासपोर्टही लागणार नाही असे सांगून आणखी मोठी सूट दिली आहे. मात्र क र्तारपूर मार्गिका उद्घाटनासाठी उपस्थित राहणाऱ्यांना २० डॉलर्सचे शुल्क लागू करण्यात आले आहे. १२ नोव्हेंबरला या मार्गिकेचे उद्घाटन होणार आहे.