भारताच्या सीमेजवळ चीनने डागली क्षेपणास्त्र, उद्दामपणे VIDEO केला व्हायरल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/china.jpg)
नवी दिल्ली: भारत आणि चीन सीमेवर अजुनही तणाव कायम आहे. दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनैतिक पातळीवर शांततेसाठी चर्चा सुरू आहे. मात्र चीनची वारंवार खोड काढण्याची सवय गेलेली नाही. सर्व चर्चांमध्ये सीमेवर शांतता ठेवण्याचं ठरलेलं असतानाही चीनने भारताच्या सीमेजवळच युद्धाभ्यास करत पुन्हा एकदा चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. या युद्ध सरावात क्षेपणास्त्रही डागण्यात आली असून त्याचा VIDEO चीनच्या सरकारी ग्लोबल टाईम्सने व्हायरल केलेला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून भारत-चीन सीमेवर प्रचंड तणाव आहे.
चीनने अनेकदा भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलेला. भारतीय सेनेने चीनचे सर्व प्रयत्न हाणून पाडलेले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करण्यासाठी चर्चेच्या फेऱ्याही सुरू आहेत. मात्र आडमुठा चीन आपलं धोरण बदलण्यास तयार नाही. याच पार्श्वभूमीवर चीनने तिबेटमध्ये युद्ध सराव केलेला आहे. चीनच्या पीपल्स आर्मीने ड्रोन्स आणि रॉकेट लाँचर्सच्या मदतीने आपल्या लक्ष्यांवर क्षेपणास्त्र डागलीत आणि त्यांना उद्ध्वस्त केलं. Tibet Theater Commandने 47 हजार फुटांवर हा अभ्यास केल्याचं ग्लोबल टाईम्सने म्हटलेलं आहे. यात वापरण्यात आलेली शस्त्रे ही 90 टक्के नवी आहेत असंही त्यात म्हटलेलं आहे.