भारताकडून लडाखमध्ये ‘आकाश’ क्षेपणास्त्र तैनात
लडाख : भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर आणि नौदलाकडून पूर्व लडाखमध्ये सीमाभागात आकाश क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आले आहेत . याआधी सीमाभागात लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले होते. त्यानंतर आता क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आले आहेत. भारताकडून चिनी विमानांना प्रत्युत्तर देण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे
चिनी विमानांच्या प्रत्यक्ष सीमारेषा भागात घिरट्या सुरु आहेत. त्याच विमानांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता भारताकडून ‘आकाश’ क्षेपणास्त्रे सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. तसेच सुखोईसारखे लढाऊ विमानेदेखील तैनात करण्यात आले आहेत. याबाबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळेकर यांनी प्रतिक्रिया दिली.
सध्या भारत-चीन युद्ध होणार नसलं तरी युद्धसदृश्य परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी भारत आणि चीनची कमांडिंग स्थरावर बैठक झाली होती. चीनने आपण सैन्य माघारी घेऊ, असं मान्य केलं होतं. मात्र, चीनने तसं केलं नाही. याउलट सीमाभागात चिनी सैन्याचे क्षेपणास्त्रांचे फोटो समोर आले आहेत. त्यामुळे चीनने त्याभागात मोठ्या प्रमाणात बांधकाम करायला सुरुवात केली आहे, असं शैलेंद्र देवळेकर यांनी सांगितलं.
चीनची आक्रमकता फक्त भारताच्या सीमेभागात वाढलेली नाही, तर दक्षिण चीन समुद्रातही व्हिएतनाम आणि इंडोनेशिया या देशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. चीनच्या आक्रमकतेविरोधात अमेरिकेने घेतलेला निर्णय महत्त्वाचा आहे. अमेरिका युरोपमधील त्यांचं सैन्य आशिया खंडात तैनात करणार आहे. चीनच्या विस्तारवादाला बळी पडलेले जे देश आहेत, यामध्ये जपान, व्हिएतनाम, इंडोनेशिया, तैवान या सर्वांना एक प्रकारचं मानसिक समर्थन अमेरिकेकडून मिळालं आहे, असंदेखील शैलेंद्र देवळेकर म्हणाले.