भाजप आणि मोदींच्या अहंकाराचा कर्नाटकात पराभव – राहुल गांधी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/rahul-gandhi-karnatak-5.jpeg)
नवी दिल्ली – कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहंकाराचा पराभव झाल्याची बोचरी टीका केली आहे. त्यांनी येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्लाबोल केला.
कर्नाटकमध्ये जनादेशाचा भाजपने अवमान केला आणि केवळ अहंकारापोटी सत्ता स्थापन केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघाची या खेळीमागे फूस होती.
देशातील प्रत्येक घटनात्मक संस्थेच खच्चीकरण करण्याची संघाची खेळी असून यावेळी कॉंग्रेस-जेडीएसच्या आमदारांची खरेदी करण्याचा प्रयत्न झाला. त्याच्या टेप्स बाहेर आल्या आहेत, असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचार संपवण्याची कशी भाषा करू शकतात, असा सवालही त्यांनी केला. त्याचबरोबर येडियुरप्पा आणि भाजपचे आमदार राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रगितासाठी थांबले नाहीत. राष्ट्रगिताचा त्यांनी अवमान केला, अशी टीकाही त्यांनी केली.