breaking-newsराष्ट्रिय

भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसचे एक पाऊल मागे

पंतप्रधानपदाचा आग्रह सोडण्याचे गुलाम नबी आझाद यांचे सूतोवाच

नवी दिल्ली : केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सत्तास्थापनेपासून रोखण्यास आमचा अग्रक्रम असून भाजपेतर कोणत्याही पक्षाचा पंतप्रधान झाला तरी त्यासाठी आमचा पाठिंबाच असेल, असे सूचक वक्तव्य ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी बुधवारी रात्री बिहार दौऱ्यात केले. त्याचवेळी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष या नात्याने सोनिया गांधी यांनी निवडणूक निकालाच्या दिवशी म्हणजेच २३ मे रोजी २२ विरोधी पक्षांची ‘महाबैठक’ दिल्लीत बोलावली आहे.

आझाद यांनी सांगितले की, ‘‘आम्ही याआधीही हे स्पष्ट केले आहे की, सर्वसहमती असेल तर काँग्रेसचा पंतप्रधान होऊ शकतो, पण आमचा मुख्य हेतू भाजपला सत्तेपासून रोखणे हा आहे. त्यामुळे सर्वसहमतीने ज्या नेत्याची पंतप्रधानपदासाठी निवड होईल त्यांना आमचा पाठिंबाच राहील.’’

आम्ही नाही तर कुणीच नाही, अशी आडमुठी भूमिका आम्ही घेणार नाही, असेही त्यांनी सांगितले. काँग्रेस तसेच महाआघाडीतील पक्षांना सर्वसहमतीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवता येत नसल्यावरून भाजपच्या नेत्यांनी वारंवार टीका केली आहे. मात्र, लोकसभा निवडणूक ही कधीच पंतप्रधानपदाच्या दोन उमेदवारांमधील नसते, तर पक्ष आणि विचारधारांमधील असते, लोकांना एक नेता निवडायचा नसतो, तर विचारधारेची निवड करायची असते, त्यामुळेच ‘अगली बार’ची प्रथा आमच्या पक्षाच्या चौकटीत बसणारी नाही, असे काँग्रेसने आधीही स्पष्ट केले आहे.

सोनियांची ‘महाबैठक’

सोनिया गांधी यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष या नात्याने सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना पत्र पाठवले असून निवडणूक निकालाच्या दिवशी २३ मे रोजी बैठक बोलावली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारधुमाळीत सोनिया गांधी या अग्रभागी नव्हत्या. मात्र पडद्यामागे राहून राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नसलेल्या पक्षांच्या नेत्यांशी त्यांनी संपर्क वाढवला आहे. त्याचप्रमाणे निवडणुकीचे निकाल संमिश्र आले, तर विरोधकांना समर्थ पर्याय देता यावा, यासाठी त्यांनी व्यूहरचनाही केली आहे. त्यासाठी बिजू जनता दलाचे नवीन पटनाईक, वाय एस आर काँग्रेसचे जगन मोहन रेड्डी आणि तेलंगण राष्ट्र समितीचे के. चंद्रशेखर राव यांच्याशी संवाद साधण्याची जबाबदारी कमल नाथ यांच्यासह काही ज्येष्ठ नेत्यांवर सोपविण्यात आली आहे.

विशेष म्हणजे वायएसआर काँग्रेसचे जगन यांच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसने सुरू केला असला, तरी आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीतले त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू हे नाराज होण्याचीही शक्यता आहे. असे असताना जगन यांना संयुक्त पुरोगामी आघाडीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button