भय्युजी महाराजांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत निर्णय नाही
इंदोर : भय्युजी महाराज यांनी संपत्तीचे आर्थिक अधिकार सेवेकरी विनायक दुधाडे यांना दिल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या ट्रस्टच्या एका पदाधिका-याने स्पष्ट केले आहे की, आर्थिक अधिकाराबाबत सद्या कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
भय्युजी महाराज यांच्या सुसाइड नोटवरून हा मुद्दा समोर आला आहे. याबाबत बोलताना श्री सद्गुरु दत्त धार्मिक ट्रस्टचे सचिव तुषार पाटील म्हणाले की, आम्ही याबाबत काही विचार करण्याच्या मनस्थितीत सद्या नाहीत. त्यांनी संकेत दिले की, काही दिवसानंतर ट्रस्टची बैठक बोलावून याबाबत निर्णय घेतला जाईल.
पाटील म्हणाले की, आम्ही बैठक घेऊन हे निश्चित करू की, महाराजांनी सुरू केलेल्या विविध योजना कशा प्रकारे पूर्ण करायच्या आहेत. त्यांनी सांगितले की, भय्युजी महाराज यांनी २१ मार्च १९९९ मध्ये स्थापन केलेल्या ट्रस्टमध्ये ११ ट्रस्टी आहेत. ही संस्था मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि अन्य राज्यात कृषि, जल संरक्षण आणि सामाजिक कार्यात काम करते.